कचरा उघड्यावर टाकत असाल, तर तुमच्या शिक्षणाचा काय फायदा?

हणज​ण पंचायतीने लावले जनजागृती फलक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11th January, 11:29 pm
कचरा उघड्यावर टाकत असाल, तर तुमच्या शिक्षणाचा काय फायदा?

म्हापसा : आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि नाईटलाइफसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या हणजूण गावात सध्या सर्वांत मोठी समस्या म्हणजे उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे ढिग आहेत. परंपरागत सूचनांचा काहीही परिणाम होत नसल्याने पंचायतीने आता थेट, थोडेसे कठोर आणि अंतर्मुख करणारे संदेश देणारे जनजागृती फलक गावातील अनेक ‘ब्लॅक स्पॉट’ ठिकाणी लावले आहेत. ‘जर तुम्ही रस्त्यावर कचरा फेकत असाल आणि तो एखाद्या अशिक्षित व्यक्तीने उचलावा अशी अपेक्षा करत असाल, तर तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग?’ असा स्पष्ट आणि बोचरा संदेश या फलकांवर झळकत आहे.
हा संदेश काहींना जुनाट वाटू शकतो; मात्र पंचायत अधिकाऱ्यांच्या मते हा निर्णय सर्जनशीलतेपोटी नव्हे, तर परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे घ्यावा लागला आहे.
हणजुणमध्ये घरोघरी ओला आणि सुका कचरा दररोज गोळा केला जात असला, तरीही मोकळ्या जागांवर आणि रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिग साचत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, हजारो पर्यटक येणाऱ्या या गावात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामसभांमध्ये हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात असून, गावकऱ्यांनी परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र प्रत्यक्षात फारसा बदल झालेला नाही.
सरपंच सुरेंद्र गोवेकर यांनी सांगितले की, पंचायतीने सर्व नेहमीचे उपाय करून पाहिले आहेत. आमच्याकडे घरोघरी कचरा संकलनाची योग्य व्यवस्था आहे. तरीही अनेक लोक उघड्यावर, अनेकदा अंधाराचा फायदा घेऊन कचरा टाकतात, असे ते म्हणाले.
कचरा कंत्राटदार किंवा संकलन व्यवस्थेत काही त्रुटी असतील, तर त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. जर काही उणीवा असतील, तर आम्ही व्यवस्था सुधारण्यास किंवा अतिरिक्त मनुष्यबळ देण्यास तयार आहोत. पण गावकऱ्यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही समस्या केवळ घरगुती कचऱ्यापुरती मर्यादित नाही. खर्च वाचवण्यासाठी किंवा कचरा वर्गीकरणाचे नियम टाळण्यासाठी काही लहान रेस्टॉरंट्स, समुद्रकिनाऱ्यावरील झोपड्या आणि अगदी काही नाईटक्लबही बेकायदेशीरपणे कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे.
नियमांपेक्षा विवेक जागा होईल का?
हे फलक लावून पंचायत विशेषतः सुशिक्षित आणि व्यावसायिक वर्गाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण आणि साधने उपलब्ध असूनही मूलभूत नागरी जाणीव नसल्याचे विडंबन अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम केवळ दंडात्मक कारवाईऐवजी जनजागृतीवर भर देण्याचा प्रयत्न आहे. मात्र नियम अपयशी ठरत असताना किमान सार्वजनिक विवेक तरी जागा होईल का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आता हा संदेश लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो की तोही अंधारात दुर्लक्षित होणारा आणखी एक फलक ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.