
मडगाव : गोव्यात (Goa) रस्ते खोदकाम करून केल्या जाणार्या कामांचा अहवाल मागवला आहे. मे महिन्यांपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानंतर कुणालाही रस्ते (Roads) खोदकाम करु देणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
मडगाव (Margao) येथील राष्ट्रीय युवा दिनाच्या (National Youth Day) कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मे महिन्यानंतर केबल्स टाकण्यासाठी रस्ते खोदकाम करण्यास परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभा अधिवेशनाबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण आता सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्याने आपण प्रश्न मांडणार नाही तर निर्णय घेण्याचे अधिकार असल्याने विरोधकांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार. मडगाव परिसरासाठी आवश्यक ते सर्व कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत व बहुतांशी कामांची सुरूवात झालेली आहे. रस्त्यांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पण राज्यात सगळीकडे रस्त्याच्या डागडुजीची कामे जोरात सुरू आहेत. मुख्य रस्त्यांची डागडुजी प्रामुख्याने केलेली आहे. इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असतील त्याठिकाणी कामे केली जात आहे. नावेली मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केलेली असून त्याठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे तसेच वीजवाहिनी टाकण्याचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती करण्यास विलंब होत आहे. राज्यातील रस्ते खोदकाम करून कोणकोणती सुविधा देण्याची कामे करावयाची आहेत. त्याबाबतचा अहवाल मागवलेला आहे. जी कामे सुरू आहेत. ती मे महिन्याआधी पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानंतर कुणालाही केबल्स किंवा इतर कामांसाठी रस्ते खोदकाम करू देणार नाही. मे महिन्यात रस्ते हॉटमिक्सिंग केले जातील, असे मंत्री कामत यांनी स्पष्ट केले.