विरोधकांची हौदात धाव; मार्शल्सनी काढले बाहेर.

गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून वादळी सुरुवात झाली आहे. नवनियुक्त सभापती डॉ. गणेश गावकर यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच अधिवेशन असून, पहिल्याच दिवशी बर्च क्लब दुर्घटना आणि निवडणुकीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.
LIVE FEED
REFRESH PAGE FOR LATEST UPDATES :
१२: २४ कुशावती जिल्ह्यामुळे पर्यटन, पायाभूत सुविधांचा विकास होऊन वेळेची बचत होईल. २०२३-२४ मध्ये राज्याचा आर्थिक विकास दर १४.९४% नोंदवला गेला. 'माझे घर' योजनेमुळे हॅप्पीनेस इंडेक्स वाढणार, तर साक्षरता प्रमाण ९९.७२% वर.
१२: ०५ राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात प्रस्तावित 'कुशावती' जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले. हा जिल्हा प्रशासकीय विकेंद्रीकरणासह 'विकसित गोवा २०३७' कडे टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
११: ५० बर्च दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहून चर्चेची मागणी केली, पण राज्यपाल केवळ सरकारची 'स्क्रिप्ट' वाचत आहेत, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.
११:३७ : बर्च दुर्घटनेवरून रणकंदन; सर्व विरोधी आमदार सभागृहाबाहेर
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेल्याच्या घटनेवरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असतानाच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह सर्व विरोधी आमदारांनी या प्रकरणावर चर्चेची मागणी करत गोंधळ घातला. यामुळे सर्व विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले असून पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे.
११:३२ : जनगणनेमुळे निवडणूक लवकर? विजय सरदेसाईंचा मोठा दावा
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी निवडणुकांबाबत एक नवा तर्क मांडला आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार असल्याने, प्रशासकीय सोयीसाठी फेब्रुवारी २०२७ मध्ये नियोजित असलेली विधानसभा निवडणूक डिसेंबर २०२६ मध्येच घेतली जाऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
११:१३ : घटनात्मक औपचारिकता आणि राज्यपालांचे अभिभाषण
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीची माहिती दिली. आजचा दिवस प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण आणि इतर घटनात्मक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
१०:५६ ५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचा बिगुल वाजला
गोवा विधानसभेच्या ५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला सकाळी ११:३० वाजता अधिकृतपणे प्रारंभ झाला. १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण पाच बैठका होणार असून, विविध जनहितार्थ मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
१०:३६ : सभापती म्हणून डॉ. गणेश गावकर यांचे पहिले अधिवेशन
नवनियुक्त सभापती डॉ. गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या कामकाजाला सुरुवात झाली. सभापती म्हणून निवडून आल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच अधिवेशन असल्याने राजकीय वर्तुळात याकडे कुतूहलाने पाहिले जात आहे.
![]()
पणजी: गोवा विधानसभेच्या पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवार १२ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे अभिभाषण होणार आहे. राष्ट्रगीताने सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होईल, त्यानंतर राज्यपालांचे भाषण आणि सचिव स्तरावर विविध महत्त्वाच्या विधेयकांवरील राज्यपालांच्या मंजुरीचा अहवाल पटलावर ठेवला जाईल. यामध्ये गोवा जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक, पंचायत राज सुधारणा विधेयक, पर्यटन स्थळ संरक्षण आणि अनधिकृत बांधकाम नियमितीकरण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.