राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधक आक्रमक

मार्शलांकडून काढले बाहेर : बर्च क्लब दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ


12th January, 11:59 pm
राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधक आक्रमक

सभापतींसमोरील हौद्यात हातात फलक घेऊन उतरलेले विरोधी आमदार. (नारायण पिसुर्लेकर)
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. बर्च क्लब दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्याच्या आणि त्यावरील चर्चेच्या मागणीवरून विरोधी आमदारांनी सभागृहात गदारोळ केला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी सभापतींच्या समोरील हौद्यात धाव घेतली. अखेर मार्शलना बोलावून विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.
सोमवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी अभिभाषणाला सुरुवात करताच विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. बर्च दुर्घटनेत ज्या २५ निष्पाप लोकांचा जीव गेला, त्यांच्यासाठी एक मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, राज्यपालांनी भाषण सुरूच ठेवल्याने संतापलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. बर्च दुर्घटनेतील मृतांना न्याय देण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन विरोधकांनी सरकारचा निषेध केला आणि हौद्यात धाव घेतली.
सभापतींनी विरोधी आमदारांना जागेवर बसण्याची विनंती केली; परंतु गदारोळ न थांबल्याने त्यांनी मार्शलांकडून विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर युरी आलेमाव, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा, व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आणि वीरेश बोरकर यांनी विरोधी पक्ष कक्षात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत युरी आलेमाव यांनी बर्च दुर्घटनेला ‘सरकारने केलेला खून’ संबोधले. ते म्हणाले की, सरकारने दिलेली ‘स्क्रिप्ट’च राज्यपाल वाचत आहेत. या प्रकरणात हडफडेचे तत्कालीन सरपंच, सचिव आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना ‘बळीचा बकरा’ बनवले आहे. वास्तविक या दुर्घटनेसाठी पंचायतमंत्री, पर्यावरणमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती.


सीझेडएमपी २०११ नुसार बर्च क्लब खाजन जमिनीत आहे. सीझेडएमपी आराखड्यात बागा नदीशेजारी २ लाख चौ.मी. जमीन खाजन दाखवली आहे. प्रत्यक्षात ८ लाख चौ.मी. जमीन खाजन आहे. या गैरप्रकारामुळे हा क्लब मीठागरात उभारला गेला.
- विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरर्वर्ड


नैतिक जबाबदारी स्वीकारून पंचायतमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरणमंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. येथे मुख्यमंत्री आम्हाला बाहेर काढण्याच्या सूचना सभापतींना देताता यावरून सरकार हुकूमशाहीचा कारभार करत असल्याचे सिद्ध होते. मागील अधिवेशनात माझ्या मिठागराच्या ठरावावर या क्लबचा उल्लेख मी केेला होता. तेव्हा माझीच कुचेष्टा केली गेली होती.
- वीरेश बोरकर, आमदार, सांतआंद्रे      

हेही वाचा