हणजूण येथील ‘गोया’ नाईट क्लब ३० दिवसांत जमीनदोस्त करा!

उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : शेतजमिनीचे रूपांतर केल्याबद्दल १५ लाखांचा दंड


7 hours ago
हणजूण येथील ‘गोया’ नाईट क्लब ३० दिवसांत जमीनदोस्त करा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हणजूण येथील वादग्रस्त ‘गोया’ नाईट क्लब ३० दिवसांत जमीनदोस्त करून जागा पूर्ववत करावी. तसेच शेतजमीन बेकायदेशीरपणे बिगरशेती वापरासाठी रूपांतरित केल्याबद्दल १५ लाख रुपयांचा दंड ठोठावणारा आदेश बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी दिला आहे.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला ६ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीत बर्च क्लब आवश्यक परवाने न घेता चालविला जात असल्याचे आढळून आले होते. याची दखल घेऊन सरकारने प्रशासकीय यंत्रणांना किनारी भागातील नाईट क्लब आस्थापनांवर कारवाईचे निर्देश दिले होते. संयुक्त अंमलबजावणी पथकाचीही नियुक्ती सरकारने केली होती.
या पथकाने किनारी भागांतील क्लबची तपासणी केली. त्यावेळी ‘गोया’ क्लब बेकायदेशीररीत्या थाटल्याचे उघडकीस आले होते. हणजूण मधील सर्वे क्रमांक ४१०/१ मधील शेतजमिनीत हा क्लब उभारला होता. या क्लबला अग्निसुरक्षा परवाना नव्हता. त्यामुळे तो सील करण्यात आला होता.
गोवा महसूल कायद्याचे उल्लंघन करून क्लबचे बांधकाम केले होते. बार्देश मामलेदारांनी अहवाल सादर करून उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन उपजल्हिधिकारी वर्षा परब यांनी ‘गोया’ क्लबचे मालक हिमांशू मल्होत्रा (दिल्ली) यांना ३० दिवसांत क्लबचे बांधकाम जमीनदोस्त करा आणि संबंधित शेतजमीन मूळस्थितीत आणा. शिवाय शेतजमिनीचे रूपांतरण व्यावसायिक वापरासाठी केल्याचा ठपका ठेवून १५ लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
३० दिवसांनंतर मामलेदार करतील कार्यवाही
यासाठी ३० दिवसांची मुदत उपजिल्हाधिकाऱ्यांनी मल्होत्रा यांना दिली आहे. हा आदेश १६ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता. मुदतीत आदेशाची कार्यवाही करण्यास अपयश आल्यास मामलेदारांकडून वरील आदेश अंमलात आणला जाईल. यासाठी लागणारा खर्च प्रतिवादीकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केला जाईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
मल्होत्रांची प्रशासकीय लवादाकडे धाव
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘गोया’ क्लबचे मालक हिमांशू मल्होत्रा यांनी राज्य सरकारच्या प्रशासकीय लवादासमोर आव्हान दिले आहे. बार्देश मामलेदारांना आव्हान याचिकेमध्ये प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

हेही वाचा