संशयित आलेक्सीकडून पोलिसांची दिशाभूल

पणजी : गोव्यात (Goa) दोन रशियन (Russian) महिलांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला रशियन नागरिक आलेक्सी लिओनोव चौकशीत धक्कादायक खुलासे करून पोलिसांचा (Police) संभ्रम वाढवत आहे. ‘एलिना’ नावाच्या महिलांविषयी आपल्याला द्वेष असून, आपल्या आईचे नाव एलिना होते व बालपणात तिने आपली उपेक्षा केल्याचा दावा आलेक्सीने केला आहे.
मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की; हा द्वेषच हत्येचा थेट हेतू नव्हता. याप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आलेक्सी आणि मृत महिलांमधील आर्थिक वाद हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आलेक्सी लिओनोव्ह हा अग्निकला (फायर डिस्प्ले) सादर करणारा कलाकार असून, त्याने ३७ वर्षीय एलिना कास्थानोवा आणि एलेना वानेवा; या दोन रशियन महिलांची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दोघीही त्याच्या निकटच्या मैत्रिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस तपासानुसार, कास्थानोवा २४ डिसेंबरला गोव्यात आली होती आणि हरमल येथील भाड्याच्या घरात गुरुवारी रात्री तिचा मृतदेह आढळून आला. आरोपीने तिच्यावर हल्ला करून दोरीने हात बांधले आणि धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे, मोरजी येथील भाड्याच्या निवासस्थानी गेल्या बुधवारी रात्री उशिरा एलेना वानेवा हिचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने आणखी काही महिलांच्या हत्यांचे दावे केले होते. मात्र, पोलिसांनी त्याचे दावे खोटे व विसंगत असल्याचे स्पष्ट केले आहे. एका प्रकरणात, परदेशी महिलेची हत्या केल्याचा त्याचा दावा तपासात खोटा ठरला असून ती महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आसाममधील एका ४० वर्षीय महिलेच्या मृत्यूबाबतही आरोपीने हत्या केल्याचा दावा केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार त्या महिलेचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर गळा दाबल्याच्या किंवा इतर हिंसाचाराच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत.
पोलिसांच्या मते, आलेक्सी लिओनोव्हमध्ये मानसोपचारात्मक (सायकोपॅथिक) प्रवृत्ती दिसून येत असून, तो घटनांचे अतिरंजित वर्णन करत आहे. सध्या उपलब्ध पुरावे दोन रशियन महिलांच्या हत्येपुरतेच मर्यादित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, संशयित आरोपीच्या दाव्यांची सखोल पडताळणी केली जात आहे.