मडगावातील वीज खांबांवरील बेकायदा केबल्सवर कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाणार!

सुट्ट्यांचा फायदा घेत मडगावात केबल्स टाकण्याचे काम

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
मडगावातील वीज खांबांवरील बेकायदा केबल्सवर कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाणार!

मडगाव: शनिवार ते सोमवार या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मडगाव शहरात वीज खांबांवर बेकायदेशीरपणे केबल्स टाकण्याचे काम जोमाने सुरू आहे. मडगाव पोलिसांनी या प्रकारात सहभागी असलेल्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी दिला आहे.




वीज खात्याचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी यापूर्वीच मडगावातील वीज खांबांवरील बेकायदेशीर केबल्स तोडून टाकत धडक कारवाई सुरू केली होती. विशेषतः इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी वीज खांबांचा वापर बेकायदेशीरपणे केल्याने त्यांनी कडक पवित्रा घेतला आहे. शेट्ये यांनी १७ जानेवारी रोजी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून अशा कंपन्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी काही कंपन्यांविरुद्ध गुन्हेही नोंदवले आहेत.




मात्र, या कंपन्या पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांना न जुमानता पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे खांबांवर केबल्स टाकून लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे हे उल्लंघन असल्याचे शेट्ये यांनी म्हटले आहे. दरम्यान, शेट्ये यांनी समाजमाध्यमांवर काही छायाचित्रे प्रसारित केली असून, सुट्यांच्या कालावधीत सुरू असलेले हे बेकायदा काम मडगाव पोलिसांनी थांबवावे, अशी मागणी केली आहे. जर पोलिसांनी ठोस भूमिका घेतली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा