स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन ९ हजारांवरून १२ हजार रुपये

महिन्याच्या भत्त्यातही दोन हजारांची वाढ


3 hours ago
स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन ९ हजारांवरून १२ हजार रुपये

स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीच्या बैठकीला उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्वातंत्र्यसैनिक.
......
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील स्वातंत्र्या सैनिकांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) ९ हजारांवरून १२ हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निवृत्तीवेतनाबरोबरच दर महिन्याला मिळणाऱ्या भत्त्यातसुद्धा घसघशीत दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जाे तीन हजार रुपयांचा भत्ता मिळत होता, तो आता थेट पाच हजार रुपयांवर नेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीत स्वातंत्र्य सैनिकांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांना दर महिन्याला निवृत्तीवेतनापोटी मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी वारंवार केली जात होती. स्वातंत्र्य सैनिकांना यापूर्वी निवृत्तीवेतन आणि भत्ता मिळून दर महिन्याला १२ हजार रुपये मिळत होते. आता यापुढे त्यांना एकूण १७ हजार रुपये मिळणार आहेत. स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानाने जीवन व्यतीत करता यावे यासाठी त्यांच्या मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यांचा सरकार संवेदनशीलतेने विचार करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यूनंतर सरकारतर्फे आदरांजली
स्वातंत्र्य सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारापूूर्वी त्यांना सरकारच्या वतीने मानवंदना दिली जाईल. अंत्यसंस्कारावेळी उपजिल्हाधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक उपस्थित राहून सरकारच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकाच्या पार्थिवावर पुष्पहार घालून त्यांना आदरांजली वाहतील. स्वातंत्र्यसैनिक कल्याण समितीची नियमित बैठक घेतली जाईल. या बैठकीत त्यांच्या समस्यांवर चर्चा होऊन त्या सोडवण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.