मुख्यमंत्र्यांची सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा : ऑडिट सादर करण्याचे निर्देश

पणजी येथील शाखेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी केलेली गर्दी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ऑडिट अहवाल तसेच सहकार निबंधकांनी मागितलेली कागदपत्रे लवकरात लवकर सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक/प्रतिनिधी मंडळाला दिले. ऑडिट अहवाल आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी चर्चेत स्पष्ट केले. दरम्यान, एनओसी रद्द केल्यानंतर राज्यातील खातेदारांनी आणि ठेवीदारांनी बुधवारी सोसायटीमधून पैैसे काढण्यासाठी शाखांमध्ये गर्दी केली होती.
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट सोसायटीला गोव्यात आणखी १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द करण्याचा आदेश मंगळवारी जारी झाला. या आदेशानंतर राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. बुधवारी दिवसभर पणजीसह इतर शाखांमध्ये ठेवीदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. कर्मचाऱ्यांकडे सोसायटीविषयी चौकशी करताना बरेच जण विड्रॉवल स्लिप भरताना दिसत होते. तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने मागील बऱ्याच वर्षांचा ऑडिट अहवाल सादर केलेला नाही. सहकार निबंधकांनी त्यांना नोटिसा जारी केल्या. या नोटिसांनाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी कागदपत्रे तपासण्यासाठी गेले, त्यावेळीही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक ते सहकार्य केले नाही. सोसायटीच्या अार्थिक स्थितीविषयी सरकारला कोणतीच माहिती नसल्याने सरकारने मंगळवारी १३ शाखा सुरू करण्यासाठी दिलेली एनओसी रद्द केली. त्यानंतर सोसायटीच्या संचालक आणि प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. एनओसी रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सोसायटीच्या प्रतिनिधी मंडळाने केली. दरम्यान, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. 
सोसायटीच्या अार्थिक स्थितीची कल्पना नाही : सुभाष शिरोडकर
तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडला २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षी नोटिसा जारी केल्या होत्या. या नोटिसींना त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. सोसायटीने ऑडिट अहवालही सादर केला नाही. त्यामुळे एनओसी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सोसायटीने ऑडिट अहवाल आणि अन्य कागदपत्रे सादर केल्यानंतर अार्थिक स्थितीची माहिती सरकारला मिळेल. त्यामुळे सध्या तरी सोसायटीच्या स्थितीवर भाष्य करता येणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष शिराडकर यांनी स्पष्ट केले.
एनओसी रद्दचा निर्णय मागे घ्या : सोसायटी
सोसायटीची एनओसी रद्द करण्याचा आदेश मागे घ्यावा, असे पत्र तिरुमला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पणजी शाखेने सहकार निबंधकांना पाठवले आहे. यापुढे सोसायटी सर्व कागदपत्रे वेळेत सादर करेल, असे पत्र पणजी शाखेचे प्रतिनिधी दीप्तेश सावंत यांनी सहकार निबंधकांना लिहिले आहे. कागदपत्रे सादर केली नसल्याबद्दल शाखेन दिलगिरी व्यक्त केली आहे.

सहकार निंबधकांनी यापूर्वी नोटिसा जारी करून जी कागदपत्रे मागितली आहेत, तीसोसायटीच्या प्रतिनिधींना शक्य तितक्या लवकर सादर करायला सांगितले आहे. ऑडिट अहवाल तसेच कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची तपासणी होईल. त्यानंतर सोसायटीच्या एनओसीविषयी निर्णय होईल.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री