तिरुपती लाडूमध्ये वापरले बाथरूम साफ करण्याचे केमिकल

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा धक्कादायक दावा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
तिरुपती लाडूमध्ये वापरले बाथरूम साफ करण्याचे केमिकल

तिरुपती : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरातील लाडू प्रसाद प्रकरणात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात बाथरूम साफ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल मिसळण्यात आले होते.
कुर्नूल येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले, हा प्रकार केवळ तिरुपतीपुरताच मर्यादित नसून, श्रीशैलम मंदिरातही असाच गैरप्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याआधी नायडूंनी लाडूंसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात बीफ टॅलो आणि डुकराची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. मात्र, सीबीआयच्या चार्जशीटनुसार तुपात कोणतीही प्राणिजन्य चरबी आढळलेली नाही.
तथापि, तपासात वनस्पती तेल आणि काही रासायनिक पदार्थ वापरून तुपात भेसळ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही भेसळ २०१९ ते २०२४ या कालावधीत झाल्याचा आरोप असून, त्या काळात राज्यात वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकार सत्तेत होते.
तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) ने निवेदनात म्हटले आहे की, सीबीआयच्या चार्जशीटनंतर भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पक्षाच्या माहितीनुसार, मार्च २०२२ ते मे २०२४ या काळात आरोपींनी बनावट नावांनी बिले तयार करून सुमारे ८,९०० किलो लॅबसा (अ‍ॅसिड स्लरी) आणि लॅक्टिक अ‍ॅसिड पुरवल्याचा आरोप आहे. टीडीपीच्या म्हणण्यानुसार, लॅबसा हे अत्यंत धोकादायक रसायन असून ते गिळल्यास गंभीर इजा किंवा मृत्यूही होऊ शकतो.
वायएसआर काँग्रेसचा पलटवार
दरम्यान, वायएसआर काँग्रेस पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावत, हा प्रकार राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी म्हणाले, सीबीआयच्या अहवालात कुठेही प्राणिजन्य चरबीचा उल्लेख नाही आणि वायएसआरसीपीशी संबंधित कोणाचेही नाव चार्जशीटमध्ये नाही. ते पुढे म्हणाले की, हा विषय सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत नेण्याचा आमचा विचार आहे. सरकारकडून खोटा प्रचार केला जात आहे.
राजकारण विरुद्ध श्रद्धा
रेड्डींनी नायडू, त्यांचे पुत्र एन. लोकेश आणि पवन कल्याण यांच्यावर टीका करत, देवाला राजकारणात ओढले जात आहे, असा आरोप केला. एकीकडे पवित्र प्रसादातील भेसळीचे गंभीर आरोप, तर दुसरीकडे राजकीय आरोप–प्रत्यारोप सुरू असल्याने, तिरुपती लाडू प्रकरण आता केवळ धार्मिक नव्हे, तर मोठे राजकीय प्रकरण बनले आहे.

हेही वाचा