पोटाची खळगी शेजाऱ्यांच्या जिवावर, डोक्यावरचे छत देवाच्या भरवशावर..

चार वर्षांपासून मातीच्या मोडकळीस आलेल्या घरात वास्तव्य; वाचा पेडणेतील हतबल कुटुंबाची व्यथा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th February, 06:28 pm
पोटाची खळगी शेजाऱ्यांच्या जिवावर, डोक्यावरचे छत देवाच्या भरवशावर..

पेडणे: एकीकडे सरकार 'अंत्योदय' आणि जनसामान्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करत असताना, पेडणे तालुक्यातील माईण-कोरगाव येथील एका हतबल कुटुंबाची कहाणी सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. येथील रहिवासी चंद्रावती वेंजी या ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या दोन मुली गेल्या चार वर्षांपासून कधीही कोसळेल अशा मातीच्या घरात मृत्यूच्या छायेत राहत आहेत. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने या कुटुंबाला दोन वेळच्या अन्नासाठीही शेजाऱ्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे.

सरकारी दप्तरी केवळ चकरा; पदरी मात्र निराशा

 आपले जीर्ण झालेले घर पावसाळ्यापूर्वी दुरुस्त व्हावे, यासाठी चंद्रावती वेंजी गेल्या चार वर्षांपासून स्थानिक पंचायत, मामलेदार कचेरी आणि तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. घर दुरुस्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली आहे, मात्र त्यांची फाईल पुढे सरकायला तयार नाही. वारंवार होणारी पायपीट आणि हतबलता यामुळे ७० वर्षांच्या चंद्रावती सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

 चंद्रावती यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली, मंगल आणि उषा वेंजी राहतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून घराला आधार देणारा कोणताही पुरुष व्यक्ती नाही. आम्ही गरिबीत दिवस काढत आहोत, पण किमान डोक्यावर सुरक्षित छत असावे हीच आमची माफक इच्छा आहे, अशा भावना या मुलींनी व्यक्त केल्या आहेत.

घराची अवस्था भीषण; दुर्घटनेची टांगती तलवार

 सध्या या घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून छप्परही कमकुवत झाले आहे. घराची डागडुजी करण्यासाठी या कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि सरकारी मदत मिळेनाशी झाली आहे. घराची दुरावस्था पाहून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांनीही व्यक्त केली आहे. आता हे कुटुंब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे आशेने पाहत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून या गरीब कुटुंबाला हक्काचे आणि सुरक्षित घर मिळवून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा