दत्तगड-बेतोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा ठराव

ग्रामसभेत निर्णय : प्रकल्प विनावापर असल्याने कचऱ्याची समस्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
दत्तगड-बेतोडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा ठराव

फोंडा : दत्तगड–बेतोडा येथे आत्मनिर्भर भारत व पंचायत निधीतून सुमारे ६७ लाख रुपये खर्चून उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू करण्यात पंचायत मंडळाला अपयश आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प विनावापर पडून आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यास कचऱ्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. यासाठी पुढील ग्रामसभेपूर्वी प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
पंचायतीच्या सरपंचाने राजीनामा दिल्यामुळे प्रभारी सरपंच म्हणून काम पाहणाऱ्या उपसरपंच गीता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कचरा प्रकल्पाबाबत पंचायत मंडळाला जाब विचारला. पंचायत क्षेत्रात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रकल्प सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे मांडले.
यावर स्पष्टीकरण देताना प्रभारी सरपंच गीता गावडे यांनी सांगितले की, प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे तो सुरू करता आला नाही. स्थानिकांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात पुढील ग्रामसभेपूर्वी निर्णय घेऊन प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, बेतोडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मेगा प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. पंचायत क्षेत्रात आधीच पाण्याची समस्या गंभीर असून, मेगा प्रकल्पामुळे ती आणखी बिकट होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे पंचायत मंडळांनी मेगा प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला.
याशिवाय निरंकाल भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने दुचाकी चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याचे प्रकार घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या रस्त्यांचे तातडीने हॉटमिक्स करण्यासाठी पंचायत मंडळाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
माजी सरपंच व विद्यमान पंच सदस्य उमेश गावडे यांनी कचरा प्रकल्प सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. आपण सरपंच असताना कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे तो सुरू होऊ शकला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी ग्रामसभेत माजी सरपंचावर टीका करताना सांगितले की, माजी सरपंच भाजप सरकारचा उदो-उदो करत होते; मात्र गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारासोबत फिरण्याऐवजी त्यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारमधील कारभार स्पष्टपणे समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध
पंचायतीने उभारलेल्या कचरा प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असूनही गेल्या दोन वर्षांत या प्रश्नावर तोडगा काढण्यात पंचायत मंडळ अपयशी ठरल्याचा सूर ग्रामसभेत उमटला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करूनच हा वाद मिटू शकतो, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

हेही वाचा