आंदोलकांचा चिंबलमध्ये विजय, सावर्डेत संघर्ष

४४ दिवसांचा लढा यशस्वी; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ स्थलांतराचे आदेश


3 hours ago
आंदोलकांचा चिंबलमध्ये विजय, सावर्डेत संघर्ष

पेढे भरवून विजयोत्सव साजरा करताना चिंबल येथील आंदोलक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ यांना विरोध करण्यासाठी सुरू केलेले चिंबलवासीयांचे आंदोलन अखेर ४४ व्या दिवशी यशस्वी झाले. प्रशासनाने दोन्ही प्रकल्प स्थलांतरित केल्याचे लेखी आदेश काढल्यानंतर आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला. दुसरीकडे मिराबाग-सावर्डे येथील बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले. सोमवारी स्थानिकांनी बंधाऱ्याच्या कामासाठी आणलेली यंत्रसामग्री हटवून कंत्राटदाराला पिटाळून लावले. बंधारा नकोच, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून प्रखर आंदालनाचा इशारा दिला आहे.
चिंबलकरांच्या ४४ दिवसांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले. चिंबल तलावाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत असलेल्या युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या दोन्ही प्रकल्पांचे चिंबल येथून स्थलांतर करण्याचे लेखी आदेश सरकारने काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पर्यटन खात्याने युनिटी मॉल, तर सामान्य प्रशासन खात्याने प्रशासन स्तंभ स्थलांतराबाबत स्वतंत्र आदेश जारी केले आहेत.चिंबल तलावाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी ४४ वा दिवस होता. चिंबलकरांनी पणजीतील आझाद मैदानावर धडक मोर्चा काढून सरकारला एक दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. स्थलांतराबाबत तोंडी आश्वासने मिळत असल्याने आंदोलकांमध्ये संभ्रम व असंतोष होता. अधिकृत लेखी आदेश निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशाराही देण्यात आला होता.
आंदोलकांचे प्रतिनिधी अॅड. गोविंद शिरोडकर यांनी सांगितले की, दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलावले होते. बैठकीला पर्यटन व सामान्य प्रशासन खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. दहा मिनिटांच्या चर्चेनंतर प्रश्न मार्गी लागला. दोन्ही प्रकल्प स्थलांतरित करण्याचे लेखी आदेश काढले जातील, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले.आझाद मैदानावरील आंदोलनातून मुख्यमंत्र्यांपर्यंत स्पष्ट संदेश पोहोचवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही खात्यांची तातडीची बैठक बोलावली. हा विजय केवळ चिंबलकरांचा नाही, तर गोव्याचा आहे, असे शिरोडकर म्हणाले. भविष्यात गोव्यात कुठेही असे आंदोलन उभे राहिल्यास चिंबलकर पाठिंबा देतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
प्रशासनाकडून दोन्ही प्रकल्प स्थलांतराचे स्पष्ट आदेश
पर्यटन खात्याने प्रस्तावित युनिटी मॉल चिंबलच्या सर्व्हे क्र. ४०/१ येथून स्थलांतरित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या जागेवार यानंतरही कोणतेही बांधकाम केेले जाणार नाही. तसेच युनिटी मॉलसाठी झालेले काम काढून टाकून जमीन पूर्वस्थितीत आणली जाईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन खात्याने
चिंबलच्या सर्व्हे क्र. ४०/१ येथील प्रशासन स्तंभ दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा लेखी आदेश काढला आहे.
आंदोलनाची सांगता; आंदोलकांत आनंदोत्सव
या निर्णयानंतर चिंबल आंदोलकांनी एकमेकांना पेढे भरवून विजय साजरा केला. यावेळी क्लॉड आल्वारिस, लोर्ना आल्वारिस, स्वप्नेश शेर्लिकर, ‘आप’ गोवाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.      

हेही वाचा