चर्चमध्ये पोलीस नेणाऱ्या निरीक्षकाची जीआरपीत बदली

जनक्षोभानंतर कारवाई : अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


10th February, 11:58 pm
चर्चमध्ये पोलीस नेणाऱ्या  निरीक्षकाची जीआरपीत बदली

पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना आमदार व्हेंझी व्हिएगस व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कोलवा पोलीस निरीक्षकांनी पोलीस फौजफाट्यासह स्थानिक चर्चच्या धर्मगुरूंची भेट घेतल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कोलवा पोलीस ठाण्यावर धडक दिली. ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीची आणि जाहीर माफीची मागणी लावून धरली. पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिलेल्या आश्वासनानंतर निरीक्षकांची बदली राखीव दलात (जीआरपी) करण्यात आली आहे.
कोलवाचे पोलीस निरीक्षक विक्रम नायक हे पोलीस फौजफाट्यासह चर्चमध्ये गेले होते. धार्मिक स्थळी पोलीस फौजफाटा घेऊन जाणे अनाठायी आणि धार्मिक भावना दुखावणारे होते. याची माहिती मिळताच आमदार व्हेंझी व्हिएगस, वॉरेन आलेमाव, पेले फर्नांडिस यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संतोष देसाई, सिद्धांत शिरोडकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल. निरीक्षक विक्रम नायक यांची बदली केली जाईल, ग्रामस्थांच्या आरोपांची चौकशी करून प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, निरीक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. निरीक्षकांनी चर्चमध्ये फौजफाट्यासह जाण्याची चूक कबूल करून माफी मागितली. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. कोलवा येथे गुप्ता नामक व्यक्तीकडून बंगला उभारणीचे काम सुरू आहे. यात मच्छीमारांवर वाट अडवणे व मारहाण प्रकरणी आंतानिओ रॉड्रिग्ज यांच्यासह काही जणांवर गुन्हे नोंद आहेत. यावर माहिती देण्यासाठी लोकांची बैठक बोलावण्यात आली होती. चर्चचे फादर यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या बैठकीला गर्दी झाली होती. यात पोलीस बिल्डरची बाजू घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निरीक्षकांची चर्च भेट ठरली जनक्षोभास कारण
कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांनी चर्च परिसराला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत सुमारे १८ पोलीस कर्मचारी होते. निरीक्षक विक्रम नायक यांनी फादर यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चर्चा केली. पोलीस निरीक्षकांची चर्चमधील हीच भेट जनक्षोभास कारणीभूत ठरली. यानंतर कोलवा प‌रिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन या प्रकाराबाबत विचारणा केली.
कुंकळ्ळी निरीक्षकांकडे कोलवाचा अतिरिक्त ताबा
स्थानिक लोकांच्या प्रक्षोभांनंतर पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांची दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालयात राखीव दलात बदली करण्यात आली आहे. कुंकळळीचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्याकडे सध्या कोलवा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांची याआधी बदली झाली होती. मात्र, त्यानंतरही नायक यांंनी कोलवा पोलीस ठाण्याचा ताबा सोडला नव्हता.
ग्रामस्थांच्या मागण्या
पोलीस निरीक्षकांनी चर्चचे फादर आणि ग्रामस्थांची जाहीर माफी मागावी.
पोलीस निरीक्षकाची कोलवातून तत्काळ बदली करावी.
मोठ्या फौजफाट्यासह चर्चमध्ये जाण्याचे कारण स्पष्टता करावे.
पोलिसांनी जागेच्या वादातून गुप्ता नामक तक्रारदाराच्या तक्रारीनंतर स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे नोंद केले आहेत. मच्छीमारांच्या तक्रारीवरून गुप्ता नामक बिल्डरवरही गुन्हा नोंद करावा.
यापूर्वीही निरीक्षकांकडून ग्रामस्थांना चुकीची वागणूक मिळाली आहे, मारहाणही झाली आहे. त्याची चौकशी करून गुन्हा नोंद करावा.      

हेही वाचा