कदंब बससेवेत लवकरच डिजिटल क्रांती

अॅपवर तिकीट बुकिंग, बस ट्रॅकिंग, व्हॉट्सअॅप सेवांची सुविधा


3 hours ago
कदंब बससेवेत लवकरच डिजिटल क्रांती

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : कदंब वाहतूक महामंडळाच्या बससेवेतील सर्व सुविधा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी अधिक सुलभ होणार आहेत. लवकरच मोबाईल अॅपद्वारे बस तिकीट बुकिंग, बस कुठे आहे याचे थेट ट्रॅकिंग, तसेच व्हॉट्सअॅपवरून विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सुविधा कार्यान्वित करण्यासाठी महामंडळाने ‘इंटिग्रेटेड स्मार्ट ट्रान्स्पोर्ट सोल्युशन’ प्रणालीसाठी निविदा मागविल्या असून, त्या प्रक्रियेतून ही माहिती पुढे आली आहे.
निविदा मंजूर झालेल्या कंत्राटदाराला संपूर्ण प्रणालीचे डिझाईन, विकास, एकत्रीकरण, अंमलबजावणी आणि देखरेख करावी लागणार आहे. या प्रणालीमध्ये ई-टीआयएमएस व एनसीएमसी सुविधा असलेली स्वयंचलित तिकीट प्रणाली समाविष्ट असेल. प्रवाशांसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार असून, त्यावरून बसचे थेट ट्रॅकिंग करता येणार आहे. तसेच स्मार्ट कार्डसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. याशिवाय डिजिटल ऑडिट प्रणाली राबविण्यात येणार असून, बसमध्ये बसविण्यात येणाऱ्या कॅमेर्‍यांद्वारे प्रवाशांची संख्या मोजली जाणार आहे. या माहितीचा वापर करून प्रवासी संख्येचे विश्लेषण व पडताळणी केली जाणार आहे.
बसचालकांसाठी ‘ड्रायव्हर टिकीटिंग मशीन’ उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याद्वारे चालकांनाच तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच ‘व्हॉट्सअॅप टिकीटिंग प्रणाली’द्वारे प्रवाशांना थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. निविदा मंजूर झालेल्या कंत्राटदाराला या प्रणालीसाठी सहा वर्षांच्या कालावधीत मार्केटिंग, ब्रँडिंग व व्यापक देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
प्रवाशांना मिळणाऱ्या नव्या सुविधा
मोबाईल अॅपवरून तिकीट बुकिंग
बसचे थेट लोकेशन ट्रॅकिंग
व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट व माहिती सेवा
स्मार्ट कार्ड व एनसीएमसी सुविधा
कॅमेर्‍यांद्वारे प्रवासी मोजणी व डिजिटल ऑडिट

हेही वाचा