पक्ष बळकटीसाठी संघटना नियुक्त करणार ४ जिल्हाध्यक्ष

पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर. सोबत माणिकराव ठाकरे, युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा आणि फ्रान्सिस सार्दिन.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य काँग्रेस पक्षाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पक्षातर्फे चार जिल्हा संघटना तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा संघटनांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक १७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान गोव्यात येणार आहेत. यानंतर चारही जिल्ह्यांसाठी अध्यक्ष निवडले जाणार आहेत, अशी माहिती पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली. शुक्रवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे यांनी सांगितले की, केंद्रीय काँग्रेस समितीने ‘संघटन सृजन’ अभियान सुरू केले आहे. गोव्यासह निवडणुका असणाऱ्या अन्य चार राज्यांत हे अभियान राबवले जाणार आहे. यानुसार केंद्रीय निरीक्षक गोव्यात येऊन येथील कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतकांना भेटतील. केंद्रीय निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात, बूथवर जाणार आहेत. निरीक्षक सात दिवस संघटन जिल्ह्यातच मुक्काम करतील. यावेळी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या मुलाखतीदेखील घेतल्या जातील.
ठाकरे पुढे म्हणाले, निरीक्षक तीन पात्र उमेदवारांची नावे केंद्रीय समितीला कळवतील. यानंतर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे प्रदेश काँग्रेसच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण होणार आहे. निरीक्षकांना आपल्या मुक्कामादरम्यान दिवसभराचा अहवाल केंद्रीय समितीला पाठवावा लागेल. अभियानाद्वारे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळात पोहोचण्याचा उद्देश साध्य होणार आहे. केंद्रीय निरीक्षकांसोबत स्थानिक पातळीवरील तीन निरीक्षकदेखील असणार आहेत.
फेरेरा, एल्टन, विरियातो, सार्दिन स्थानिक निरीक्षक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, पक्ष संघटनेसाठी म्हादई, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती असे चार जिल्हे केले आहेत. उत्तर गोव्यात शोभा ओझा, दक्षिणेत एन. रघुवीर रेड्डी, कुशावतीसाठी विजय सिंगला, तर म्हादईसाठी आर. सी. कुंतीया निरीक्षक म्हणून काम पाहतील. याशिवाय आमदार कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, खासदार विरियातो फर्नांडिस आणि माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन हे स्थानिक निरीक्षक म्हणून काम पाहतील.