थिरूवअनंतपूरमच्या ११ नगरसेवकांचा पणजीत सत्कार

सत्कारमूर्ती नगरसेवकांसोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री विश्वजीत राणे, महापौर रोहित मॉन्सेरात व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केरळमधील थिरूवअनंतपूरम महापालिकेत ४६ वर्षांनी भाजपचा विजय झाला आहे. येथे १०१ पैकी ५० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. समर्पित कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. शनिवारी ११ नगरसेवकांचा भाजपच्या पणजी कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री विश्वजीत राणे, महापौर रोहित मॉन्सेरात व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दामू नाईक पुढे म्हणाले, केरळमधील भाजप कार्यकर्त्यांनी मागील अनेक वर्षे कष्ट केले आहेत. तेथील साम्यवादी विचारांच्या पक्षासोबत लढा देणे कठीण काम आहे. असे असले तरी ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवले. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले.
ते म्हणाले, केरळमधील विजयी नगरसेवक भाजपशासित राज्यांना भेट देत आहेत. याचाच भाग म्हणून ११ नगरसेवक दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतील. पणजी महानगरपालिका व अन्य खात्यांना भेटीही देतील. त्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे दाखवली जातील. विकसित भारत, विकसित केरळसाठी या गोष्टी उपयुक्त ठरतील.
अभिमानास्पद गोष्ट
मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, थिरूवअनंतपूरम महापालिकेत भाजपचा विजय ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या दौऱ्यात विजयी नगरसेवकांना विकसित भारत २०४७ बाबत सादरीकरण दाखवण्यात येईल. त्यांना गोव्यात नगरविकास तसेच अन्य क्षेत्रांतील मूलभूत सुविधा कशा निर्माण केल्या, याची माहिती दिली जाईल.