मुद्दे नसल्याने विरोधकांकडून वैयक्तिक टीकेचे गलिच्छ राजकारण

महापौर रोहित मॉन्सेरात यांची टीका : महापालिका उमेदवारांची यादी लवकरच


14th February, 11:48 pm
मुद्दे नसल्याने विरोधकांकडून वैयक्तिक टीकेचे गलिच्छ राजकारण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. यापूर्वीच्या महापालिका मंडळांपेक्षा आम्ही अधिक काम केले आहे. यामुळे विरोधकांना निवडणुकीत प्रचार करण्यासाठी मुद्दे मिळत नाहीत. त्यामुळेच ते शेवटच्या दहा दिवसांत सक्रिय होऊन वैयक्तिक टीकेचे गलिच्छ राजकारण करत आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर रोहित मॉन्सेरात यांनी दिली. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महापौर म्हणाले की, पावसाळ्यात पणजीतील पूरस्थिती बंद होणे अशक्य असल्याचे मानले जात होते. आम्ही ३ वर्षे पूरस्थिती नियंत्रणात आणली. चांगले काम केल्याने आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मागील पाच वर्षे विरोधकांनी काहीही केले नाही. निवडणुका तोंडावर आल्यावर त्यांना जाग आली आहे. ते लोकांना भावनिक आवाहन करून मते मागत आहेत. मात्र मतदार आमच्यासोबतच राहतील याची खात्री आहे.
ते म्हणाले, निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे. नव्या उमेदवारांना निवडणुकीसाठी प्रोत्साहित केले आहे. मतदारसंघ आरक्षणाचा विचार करून यंदा नवीन उमेदवारांना संधी दिली जाईल. ही नावे लवकरच जाहीर केली जातील. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकृत प्रचार मोहीम सुरू होईल. त्यापूर्वी आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत.
वाल्मिकी नाईक यांनी लोकांना फसवले
महापौर रोहित मॉन्सेरात म्हणाले की, कॅसिनोला माझा वैयक्तिक विरोध आहेच. मात्र कॅसिनोमुळे स्थानिकांना रोजगार, व्यवसाय मिळत आहे हेही समजून घेतले पाहिजे. कॅसिनोला विरोध करणाऱ्यांनी पर्यायी रोजगाराचा मार्ग सुचवावा. १२ फेब्रुवारी रोजी महापालिका बैठक होणार नसल्याचे मी कळवले होते. तरीही वाल्मिकी नाईक यांनी स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो यांच्यासह अन्य ज्येष्ठ नागरिकांना फसवून महापालिकेत आणले.


इच्छुक उमेदवारांबाबत चर्चा सुरू : दामू नाईक
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, पणजी महापालिका निवडणुकीत आम्ही डबल इंजिन सरकारने केलेली विकासकामे घेऊन मतदारांसमोर जाणार आहोत. इच्छुकांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मॉन्सेरात यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. काही उमेदवारांचे प्रोफाईल आम्ही पाहत आहोत.


मी माझ्या १५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. महापौर रोहित मॉन्सेरात यांनी मला अथवा ९ फेब्रुवारी रोजी निवेदनावर सही केलेल्या अन्य दोघांना १२ रोजी बैठक नसल्याचे कळवल्याचे पुरावे द्यावेत.
_ वाल्मिकी नाईक, प्रदेशाध्यक्ष, आप 

हेही वाचा