वाहतूक उल्लंघन चलनांतून महिन्याला सरासरी २.७७ कोटींचा दंड वसूल

तीन वर्षांत १४.३३ लाख ई चलन जारी; देशातून दंडापोटी १२ हजार कोटी


15th February, 11:42 pm
वाहतूक उल्लंघन चलनांतून महिन्याला सरासरी २.७७ कोटींचा दंड वसूल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील तीन वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत १४ लाख ३३ हजार ९०६ ई चलन जारी करण्यात आले. याद्वारे दंडाच्या रकमेच्या स्वरूपात सरकारने ९९.७५ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ३३.२५ कोटी, तर महिन्याला सरासरी २.७७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या देशभरातील ३२ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांत ई चलन प्रणाली सुरू आहे. वरील कालावधीत संपूर्ण देशातून सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात २०२३ मध्ये ५ लाख ५८ हजार ४८५ ई चलन जारी करण्यात आले होते. याद्वारे ३७.४५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. २०२४ मध्ये ५ लाख १७ हजार ८९२ ई चलनद्वारे ३९.१७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. २०२५ मध्ये चलन आणि दंडाची रक्कम तुलनेने कमी झाली. २०२५ मध्ये ३ लाख ५६ हजार ४२९ ई चलन जारी करण्यात आले होते. याद्वारे २३.१३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राज्यात १.३६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
२०२३ मध्ये देशभरात ४,२४३ कोटींचा दंड वसूल
देशाची आकडेवारी पाहता, २०२३ मध्ये ६.७९ कोटी चलनद्वारे ४,२४३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. २०२४ मध्ये ८.१८ कोटी चलनद्वारे ३,९९६ कोटी रुपये, तर २०२५ मध्ये ९.७८ कोटी चलनद्वारे ३,७६१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान देशात २५६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वरील कालावधीत केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ई चलन जारी करण्याचे व याद्वारे दंडाची रक्कम वसूल करण्याचे प्रमाण अधिक होते. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश राज्यात हे प्रमाण कमी होते.