महापालिका निवडणुकीची घोषणा आज शक्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजीच्या विकासाला प्राधान्य देऊन पणजीकरांच्या पसंतीचे उमेदवार महापालिका निवडणुकीत उतरवले जातील. सुरेंद्र फुर्तादो, दत्तप्रसाद नाईक, मिनीन डिक्रुज यांच्यासह सर्व पक्षांचा पाठिंबा आमच्या पॅनेलला असेल, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. पणजी महापालिका निवडणुकीत मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि उत्पल पर्रीकर यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. पणजी महापालिकेसाठी १४ मार्च रोजी मतदान आणि १६ मार्च रोजी निकाल जाहीर करण्याचा निर्णय झाला असला तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. मतदानासाठी ११ किंवा १४ मार्च तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. महापौर रोहित मॉन्सेरात, उदय मडकईकर, संतोष सुर्लीकर, नीलेश मोरजकर या दिग्गजांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
भाजपच्या काही कार्यकर्त्यांचाही पाठिंबा : उत्पल
महापालिका निवडणुकीत बाबूश पॅनेल विरुद्ध उत्पल पॅनेल अशीच थेट लढत अपेक्षित आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच पॅनेलमधील उमेदवारांची घोषणा केली जाईल. मतदारांशी गाठीभेटी सुरू आहेत. भाजपच्या काही कार्यकर्त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
निवडणुकीची घोषणा होताच पॅनेल जाहीर करू : महापौर
पणजी महापालिकेवर सुरुवातीपासून बाबूश मॉन्सेरात यांचे वर्चस्व आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी सर्व ३० प्रभागांतून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणुकीची घोषणा होताच पॅनेल जाहीर केले जाईल, असे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी म्हटले आहे.
पणजीच्या विकासासाठी आणि चांगल्या उमेदवारांसाठी उत्पल पर्रीकर यांना माझा पाठिंबा आहे. महापालिकेत कार्यक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक असावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
_ सुरेंद्र फुर्तादो, माजी महापौर, पणजी