लैंगिक शोषण प्रकरणात माजी मंत्री पालयेकरांचा जबाब नोंद

म्हापसा पोलिसांत विविध कलमांखाली गुन्हा दाखल


2 hours ago
लैंगिक शोषण प्रकरणात माजी मंत्री पालयेकरांचा जबाब नोंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : करिअरची संधी देण्याचे आमिष दाखवून मूळ उत्तरप्रदेश येथील एका २५ वर्षीय पीडित युवतीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी मंत्री विनोद पालयेकर यांचा म्हापसा पोलिसांनी जबाब नोंद केला आहे. पीडितेची मानसिक, भावनिक व वैयक्तिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०१९ ते ८ जानेवारी २०२६ या साडेसहा वर्षांच्या काळात घडला आहे. पीडितेमया तक्रारीवरून पोलिसांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने प्रथम ८ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. २२ जानेवारी रोजी व्हॉटस्अॅप चॅट व इतर पुरावे पोलिसांना दिले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये पीडित मुलगी गोव्यात आली होती. पीडितेला संगीत, गायन क्षेत्रात करिअर करायचे होते. दोघा व्यक्तींनी तिची तत्कालीन मंत्री विनोद पालयेकर यांच्याशी ओळख करून दिली. करिअर संधी पूर्ण करण्याचे आमिष संशयिताने तिला दाखवले. संशयितासोबत राहत असताना त्याने लैंगिक छळ केला, गैरवर्तन आणि शारिरीक शोषण केले. त्यामुळे आपली प्रतिष्ठा आणि शारीरिक सचोटी धोक्यात आली. संशयित करिअर संधी पूर्ण करण्यात अपयशी ठरला, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी संशयित माजी मंत्री पालयेकर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिंता कलम ६९, ७५(२) व ३१८(४) अन्वये लैगिक शोषण व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या नोटिसीनंतर संशयित पालयेकर यांनी चारवेळा पोलीस स्थानकात हजेरी लावून चौकशी अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रविना सातोडकर करत आहेत.