पणजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपात खदखद

दोन प्रभागांतील निर्णय रखडला : बाबूश समर्थकांना प्राधान्य दिल्याचा आरोप


2 hours ago
पणजी महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपात खदखद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून पणजी भाजपात मोठी खदखद निर्माण झाली आहे. महापालिकेच्या ३० पैकी २८ उमेदवारांची नावे जवळजवळ निश्चित झाली असून उर्वरित दोन प्रभागांतील उमेदवार निश्चित होताच पॅनल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या शुक्रवारी भाजप समर्थित पॅनलचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी सोमवारी सायंकाळी भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला मंत्री तथा आमदार बाबूश मॉन्सेरात, महापौर रोहित मॉन्सेरात, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. पक्षाने उमेदवार निवडीचे सर्व अधिकार बाबूश मॉन्सेरात यांना दिल्याने त्यांच्या पसंतीचेच उमेदवार जाहीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यातील अनेक नावांवर भाजप कार्यकर्त्यांनी हरकत घेतल्याने बैठकीत वादावादी झाली. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील उमेदवारांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीवरून निर्माण झालेली ही नाराजी भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे असून अंतिम पॅनल जाहीर झाल्यानंतरच पक्षातील असंतोष कितपत शमतो, हे स्पष्ट होणार आहे.
पक्षाच्या सल्ल्यानेच उमेदवार जाहीर : बाबूश मॉन्सेरात
उमेदवार निवडप्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. इच्छुकांकडून अर्ज मागवून छाननीनंतर नावे निश्चित केली जाणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्ज भरल्यानंतरही उमेदवारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगरसेवकांची कामगिरी आणि नव्या चेहऱ्यांची क्षमता विचारात घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे, असे मंत्री बाबूश मॉन्सेरात यांनी सांगितले.
भाजपने निश्चित केलेले संभाव्य उमेदवार (प्रभागनिहाय)
१ – युतिका जांबावलीकर
२ – कॅरोलिना पो
३ – मार्गारिडा फर्नांडिस
४ – रोहित मॉन्सेरात
५ – किशोर शास्त्री
६ – बेन्तो लॉरेना
७ – संजीव देसाई
८ – करिना शिरोडकर
९ – कबीर मखिजा
१० – प्रसाद आमोणकर
११ – तुकाराम चिन्ननावर
१२ – वर्षा शेट्ये
१३ – उदय मडकईकर
१४ – प्रज्योत वायंगणकर
१५ – शायनी चोपडेकर
१६ – अस्मिता केरकर
१७ – डेनिस जॉर्ज
१८ – कृष्णा शिरोडकर
२० – शुभम चोडणकर
२१ – मनीषा मणेरकर
२२ – दीक्षा माईणकर
२३ – विद्या गडकर
२४ – करण पारेख
२५ – कीर्ती साखळकर
२६ – वसंत आगशीकर
२७ – विठ्ठल चोपडेकर
२८ – रूपेश हळर्णकर
२९ – सँन्डा डिकुन्हा


मी स्वतः निवडणूक लढवणार : उदय मडकईकर
मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि माझे जुने संबंध आहेत. काही मतभेद झाले होते, मात्र ते आता दूर झाले आहेत. महापालिका निवडणुकीत मी बाबूश यांच्यासोबत आहे. माझा मुलगा राजकारणात येण्यास इच्छुक नसल्याने मी स्वतः निवडणूक लढवणार आहे, असे माजी उपमहापौर उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले.