वेळगेत जलसिंचनाचा प्रश्न तीव्र; पाण्याअभावी बागायती करपल्या

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17th February, 05:21 pm
वेळगेत जलसिंचनाचा प्रश्न तीव्र; पाण्याअभावी बागायती करपल्या

वाळपई : वाळपईतील (Valpoi) खोतोडा ग्रामपंचायत (Khotodem Panchayat) क्षेत्र सुपारी व नारळ (Coconut) यांच्या लागवडीने समृद्ध आहे. मात्र, येथील वेळगे गावामध्ये समाधानकारक जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने बागायती सुकू लागल्या आहेत. 

बागायतदार त्यामुळे संतप्त बनले आहेत. वाळपईतील जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी या संदर्भात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या; अस्तित्वात असलेला पंप हा कमी क्षमतेचा आहे. त्यातून बागायतदारांना समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही. काही बागायतींना अजून पर्यंत पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे अनेकांच्या बागायती सुकल्या आहेत. 

६ कोटींची उपसा योजना मंजूर पण..

वेगळे गावासाठी जलसिंचन खात्याने सहा कोटी खर्चून उपसा योजना मंजूर केली आहे.  मात्र; या प्रस्तावाला अजून पर्यंत अर्थखात्याची मंजुरी न मिळाल्यामुळे सदर काम सुरू होऊ शकलेले नाही. दोन वर्षांपूर्वी या योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र; अर्थ खात्याच्या मंजुरीविना अजून पर्यंत कामाला सुरूवात झाली नसल्याची माहिती स्थानिक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. 

बागायती करपू लागल्या 

 खोतोडे ग्रामपंचायत क्षेत्रातील म्हादई नदीच्या काठावर असलेल्या वेळगे गावात सुपारी, नारळ, आंबा (Mango), काजू (Cashew) बागायती आहेत.  कृषी लागवडीमुळे हा गाव समृद्ध झाला आहे. म्हादई नदीच्या पाण्यावर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बागायती निर्माण झाल्या. बंधारा योजनेतून उपसा योजनेमार्फत या गावाला जलसिंचनाची सुविधा निर्माण झाली.

पावसाळ्यानंतर बंधाऱ्यांत पाण्याचा साठा करून उपसा योजनेच्या माध्यमातून या बागायतींना पाण्याची सुविधा उपलब्ध होत असते. पावसाळा संपून जवळपास सहा महिने उलटले. बंधाऱ्यांच्या फळ्या घातल्या. मात्र; अजून पर्यंत या गावातील  बागायतींना पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही.

यामुळे संतप्त बनलेल्या बागायतदारांनी आज वाळपई जलसिंचन खात्याचे सहाय्यक अभियंता सतीश कुमार सावंत यांची भेट घेऊन या संदर्भात नाराजी व्यक्त केली. अजून पर्यंत पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बागायती करपल्या आहेत. त्या नष्ट होण्याची भीती बागायतदारांनी यावेळी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.