पणजीत जागृती बैठक : स्वाक्षरी मोहिमेला उत्तम प्रतिसाद

नवीन जहाजाला विरोध करण्यासाठीच्या निवेदनावर स्वाक्षरी करताना पणजीवासी. (नारायण पिसुर्लेकर)
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजीत मंगळवारी झालेल्या कॅसिनोविरोधातील जागृती बैठकीला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी स्थानिकांसह राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडवीत येऊ घातलेल्या नवीन कॅसिनो जहाजाला विरोध केला. प्रामुख्याने चार ठराव संमत करण्यात आले. गोव्यातील सर्व कॅसिनो कायमस्वरूपी हटवण्यासाठी मुदतीत आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली. नवीन जहाजाच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायदेशीर व अन्य मार्गाने कॅसिनोविरोधात लढाई सुरूच ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत मांडवीत येणाऱ्या ११२ मीटर लांब आणि ३० मीटर उंच कॅसिनो जहाजाला परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली. मोठ्या कॅसिनोला आणण्यासाठी नदीत गाळ उपसा सुरू आहे. हे सागरी पर्यावरणाला धोकादायक आहे. याचा परिणाम पारंपरिक मच्छीमारांवर होत आहे. गाळ उपसा व संबंधित अन्य कामे त्वरित थांबवावीत. सरकारने पणजीला जुगाराचे स्थळ म्हणून प्रोत्साहन देणे बंद करावे. गोव्याला कौटुंबिक पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. कॅसिनोवर अवलंबून असलेल्या स्थानिकांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
सबिना मार्टिन्स म्हणाल्या की, कॅसिनोमुळे सामाजिक दुष्परिणाम होत आहेत. काही कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. कॅसिनो विरोधासाठी कायदेशीर मार्गासह रस्त्यावर उतरण्याचा पर्याय तपासला पाहिजे. सध्या सह्यांची मोहीम घेऊन कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना दिली जातील. लढा तीव्र करून कॅसिनो गोव्याबाहेर काढूया.
पेट्रिशिया पिंटो म्हणाल्या, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, पणजी महापालिकेने एका कॅसिनोकडून एका महिन्यात सुमारे ४० टन कचरा गोळा केला आहे. मात्र त्या कॅसिनोने केवळ ४ टन कचरा तयार करत असल्याचा दावा केला आहे. या आंदोलनाला काही जण ‘निवडणूक स्टंट’ म्हणत आहेत. मात्र आमचा विरोध यापुढेही राहणार आहे.
राज्यात गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगवेगळे कायदे आहेत का ? सरकार जनतेला मूर्ख समजत आहे. प्रत्येक नगरपालिका, ग्रामसभेत कॅसिनोविरोधात ठराव घेतला पाहिजे. या लढ्यात सातत्य, सहनशीलता आणि निर्धार आवश्यक आहे.
_ स्वप्नेश शेर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते
माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांचा पाठिंबा
पेट्रिशिया पिंटो यांनी सांगितले की, मांडवीत येणाऱ्या नव्या कॅसिनो जहाजाच्या विरोधातील चळवळीला माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांनी पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. कॅसिनोमुळे स्थानिकांना त्रास होत आहेच शिवाय यामुळे पर्यावरणाचे नुकसानही होत असल्याचे माजी न्या. रिबेलो यांनी म्हटले आहे.
मानसिकता बदला !
पणजीला निसर्गाची देणगी आहे. शहर आणि नदी परस्परांना आवश्यक आहेत. पणजी ही आपली मालमत्ता आहे. मालमत्ता भाड्याने देऊन पैसे कमावण्याची मानसिकता बदलली पाहिजे, असे आवाहन एल्सा फर्नांडिस यांनी केले.