गलगोटिया विद्यापीठाचा 'स्मार्ट' बनाव नेटकऱ्यांनी पकडला; आयटी सचिवांनी घेतली दखल

जागा तत्काळ रिकामी करण्याचे आदेश; चीनी बनावटीचा रोबो स्वतःची निर्मिती असल्याचे सांगून ठेवला होता प्रदर्शनात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th February, 06:09 pm
गलगोटिया विद्यापीठाचा 'स्मार्ट' बनाव नेटकऱ्यांनी पकडला; आयटी सचिवांनी घेतली दखल

ग्रेटर नोएडा: 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट' या प्रतिष्ठित कार्यक्रमात गलगोटिया विद्यापीठाने प्रदर्शनास ठेवलेल्या रोबोटिक डॉगवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची गंभीर दखल घेत माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सर्व प्रदर्शकांसाठी कडक निर्देश जारी केले आहेत. प्रदर्शकांनी केवळ स्वतः विकसित केलेली उत्पादनेच प्रदर्शित करावीत आणि दुसऱ्याची उत्पादने आपली म्हणून सांगू नयेत, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोजकांनी गलगोटिया विद्यापीठाच्या पेव्हेलियनचा वीजपुरवठा खंडित केला असून त्यांना जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.



 प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी वादाला तोंड फुटले. गलगोटिया विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी प्रदर्शनातील एका रोबोटिक डॉगला 'ओरियन' (Orion) असे नाव देऊन तो त्यांच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' विभागाने स्वतः विकसित केल्याचा दावा केला. मात्र, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होताच तंत्रज्ञान प्रेमींनी हा दावा खोडून काढला. नेटिझन्सनी असा दावा केला की, हा रोबोट प्रत्यक्षात 'युनिट्री गो २' (Unitree Go 2) या चिनी कंपनीचा प्रसिद्ध रोबोटिक डॉग आहे. स्वतः चिनी कंपनीनेही हा दावा खरा असल्याचे सांगत तो त्यांचाच रोबोट असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यापीठाची मोठी नाचक्की झाली.



या फसवणुकीनंतर सोशल मीडियावर गलगोटिया विद्यापीठ आणि आयोजकांवर टीकेची झोड उठली. विद्यापीठाने चुकीची माहिती देऊन उपस्थितांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे, गलगोटिया विद्यापीठाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून हा त्यांच्या विरोधात चालवलेला 'प्रोपोगंडा' असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थी एआय प्रोग्रामिंग शिकत असून रिअल वर्ल्ड स्किल्सचे प्रात्यक्षिक दाखवत असल्याचे समर्थन विद्यापीठाने केले आहे. मात्र, आयटी सचिवांच्या कडक भूमिकेनंतर या प्रकरणाने अधिक वळण घेतले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.



हेही वाचा