थिवीतील डोंगरकापणीविरोधात ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

विद्यापीठ प्रकल्पावर तीव्र आक्षेप : काम बंद करण्याची मागणी

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
just now
थिवीतील डोंगरकापणीविरोधात ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

थिवी: थिवी मतदारसंघातील थिवी पंचायत क्षेत्रात डोंगरकापणी सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. थिवी कोमुनिदादने महाराष्ट्रातील एका विद्यापीठाला अवघ्या १ रुपया ४ पैसे दराने सुमारे २ लाख चौरस मीटर जागा दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कान्सा, थिवी व खरगाळे येथील डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या कामांविरोधात ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढून काम तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी इशारा दिला की, हे काम त्वरित थांबवले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
थिवी कोमुनिदादचे सदस्य गॉडफ्री परेरा यांनी सांगितले की, विद्यमान सरकार गोव्याच्या डोंगरमाथ्यांचा सर्वनाश करत आहे. हा डोंगर थिवी गावाचा राखणदार आहे. तो वाचवला नाही, तर गावाचा विनाश होईल. कोमुनिदादच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी कवडीमोल दरात जमीन दिली आहे, असा आरोप त्यांनी केला.
ग्रामस्थांनी या संदर्भात पंचायतला निवेदन दिले होते. मात्र संबंधित प्रकल्प हा सरकारच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डअंतर्गत येत असल्याने पंचायत काहीच करू शकत नसल्याचे सांगण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
या विद्यापीठात गोव्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नसल्याचा आरोपही करण्यात आला. शिक्षण शुल्क अत्यंत जास्त असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना ते परवडणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गोव्यातील एकही विद्यार्थी येथे शिकणार नाही, मग हा प्रकल्प कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
एका ग्रामस्थाने हा प्रकल्प मोठा आर्थिक आणि जमीन घोटाळा असल्याचा आरोप केला. गोव्यात आधीच विद्यापीठ असून त्यातील अनेक जागा रिकाम्या असतात. मग आणखी एका विद्यापीठाची गरज काय?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
पाणीटंचाई आणि परवानग्यांबाबत प्रश्न
शिरसई येथील ग्रामस्थ हेमंत कांबळी यांनी सांगितले की, या भागात धनगर समाज पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्यास आहे. येथे लावण्यात आलेल्या फलकावर पंचायतीची परवानगी आहे की नाही, याचा उल्लेख नाही. कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा सवाल त्यांनी केला. प्रकल्पासाठी बोरवेल खणण्यास परवानगी देण्यात आल्याने थिवी पंचायत क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
घरांना धोका
स्थानिक महादेव पाटील यांनी सांगितले की, डोंगरकापणी त्यांच्या घरांच्या वरच्या भागात सुरू आहे. माती कोसळून आमच्या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. मशिनरीमुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. विरोध केल्यास तरुणांवर कारवाई होईल, अशी भीतीही ग्रामस्थांत आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, कान्सा-थिवी येथील खरगाळी डोंगरमाथ्यावर प्रस्तावित वर्ल्ड पीस विद्यापीठ प्रकल्पाविरोधात मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते. गॉडफ्री परेरा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे या प्रकल्पाबाबतचे वातावरण तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा