राज्यात यूपीआयच्या वापरात होतेय उत्तरोत्तर वाढ

जानेवारी महिन्यात ६,०६४ कोटी रुपयांची उलाढाल :

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
राज्यात यूपीआयच्या वापरात होतेय उत्तरोत्तर वाढ

पणजी : सोपे, सुरक्षित असल्याने युपीआय ॲपद्वारे पेमेंट करणे हा पर्याय सुलभ झाला आहे. मागील काही वर्षात गोव्यात यूपीआय ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारात वाढ होत आहे. जानेवारी २०२६ मध्ये राज्यात युपीआय ॲपद्वारे ६,०६४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हा मागील दोन वर्षातील विक्रम ठरला आहे. याआधी राज्यात डिसेंबर २०२५ मध्ये ५,९९०, मे २०२५ मध्ये ५,६२९ कोटी तर डिसेंबर २०२४ मध्ये ५,४२७ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. केंद्रीय अर्थ खात्याने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
युपीआय ॲपमध्ये विविध राष्ट्रीयकृत, खासगी बँकाच्या ॲपसह, फोन पे, भीमपे, गुगल पे, पेटीएम अशा ॲपचा समावेश आहे. मागील दोन वर्षाची आकडेवारी पाहता गोव्यात डिसेंबर आणि मे महिन्यात पर्यटक अधिक असल्याने तुलनेने अधिक युपीआय पेमेंट असतात. यंदा जानेवारीत विक्रमी पेमेंटची नोंद झाली आहे. जानेवारी २०२६ मध्ये युपीआयद्वारे पेमेंट करण्यात गोवा देशात २३ व्या स्थानी राहिला. याआधी जानेवारी २०२४ युपीआयद्वारे ४,३१७ तर जानेवारी २०२५ मध्ये ५,०३० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते.
राज्यात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या एकूण व्यवहारांसाठी ४.०३ कोटी ट्रांजॅक्शन झाले. हा देखील विक्रम ठरला आहे. याआधी डिसेंबर २०२५ मध्ये ४.०२ कोटी ट्रांजॅक्शन झाले होते. संपूर्ण देशाचा विचार केल्यास जानेवारी २०२६ महाराष्ट्रात २.६७ लाख कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार हे युपीआय ॲपद्वारे करण्यात आले आहेत. यानंतर कर्नाटक (१.६४ लाख कोटी) ,उत्तर प्रदेश (१.५३ लाख कोटी) या राज्यांचा क्रमांक लागतो. नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, येथे युपीआय व्यवहारांचे प्रमाण तुलनेने कमी होते.
गोवा – यूपीआय व्यवहार (कोटी रुपयांत)
महिना                      व्यवहार रक्कम (कोटी रु.)
डिसेंबर २०२४            ५,४२७
मे २०२५                    ५,६२९
डिसेंबर २०२५            ५,९९०
जानेवारी २०२४           ४,३१७
जानेवारी २०२५           ५,०३०
जानेवारी २०२६            ६,०६४
गोवा – ट्रांन्झॅक्शन संख्या
महिना ट्रांन्झॅक्शन(कोटींमध्ये)

डिसेंबर २०२५      ४.०२ कोटी
जानेवारी २०२६       ४.०३ कोटी
जानेवारी २०२६ : राज्यनिहाय यूपीआय व्यवहार (लाख कोटी)
राज्य                               व्यवहार रक्कम
महाराष्ट्र                           २.६७ लाख कोटीहून अधिक
कर्नाटक                          १.६४ लाख कोटी
उत्तर प्रदेश                      १.५३ लाख कोटी
गोवा                               ६,०६४ कोटी                  

हेही वाचा