आमदार वीरेश बाेरकर निघाला सत्तरीचा भाचा

मंत्री राणेंच्या कृतीमुळे वीरेशची आई भावूक


21st February, 06:11 pm
आमदार वीरेश बाेरकर निघाला सत्तरीचा भाचा

टीसीपी कार्यालयातून आमदार वीरेश बोरकर यांना उचलून बाहेर आणताना पोलीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नेहमी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या खात्याच्या विरोधात आंदोलन करणारे सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर हे राणेंच्या सत्तरीचेच भाचे निघाले. प्रतापसिंग राणे यांनी अनेक दशके सत्तरीतील पर्ये मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. वाळपईचे आमदार म्हणून विश्वजीत राणे गेली काही वर्षे निवडून येत आहेत. विश्वजीत राणे सत्तरीतील दोन्ही मतदारसंघांतील लोकांना परिचयाचे आहेत. गेली काही वर्षे विश्वजीतच दोन्ही मतदारसंघांत प्रचाराची धुरा संभाळतात.
रिव्हॉल्युशनरी गोवन्स आणि विश्वजीत राणे यांच्यात वारंवार खटके उडत असतात. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर आणि राणे यांच्यात विधानसभेतही ‘तू तू मै मै’ होत असते. राणेंकडे असलेल्या नगर नियोजन खात्यावर अनेकदा बोरकर यांनी मोर्चे नेले. पाळे-शिरदोन येथील झोन बदलमामुळे शनिवारपासून स्थानिकांसोबत वीरेश बोरकर नगर नियोजन कार्यालयात ठाण मांडून आहेत. शनिवारी पोलिसांनी बोरकर यांना नगर नियोजन खात्यातून फरफटत बाहेर काढले. पोलिसांच्या या कृतीनंतर वीरेशची आई भावूक झाली. तिने शापही दिला. हे बोलताना त्यांनी वीरेश हा सत्तरीचा भाचा असल्याचे नमूद केले. भाच्याला ही वागणूक तर राणे गोव्यातील जनतेला काय वागणूक देतील त्याची कल्पना गोव्यातील जनतेनेच करावी, असे त्या म्हणाल्या.
‘पोलिसांनी वीरेशला दिलेली वागणूक राणेंमुळेच’
आमदार वीरेश बोरकर यांची आई सत्तरीतील ठाणे गावातली. त्या म्हणाल्या मी सत्तरीतील ठाणे गावची. वीरेश ठाणेचा म्हणजेच सत्तरीचा भाचा. ठाणेची लोकदेवता असलेले मंडळगीरो, कोळगिरो हे साठा सत्तरीचे देव. एका हाकेला पावतात. ते कोणाला सोडणार नाहीत. लहानपणातही वीरेशला कधी आम्ही हात लावला नाही. आज त्याला पोलिसांनी ही वागणूक राणेंमुळे दिली. सत्तरीचा भाचा असलेल्या वीरेशला हात लावला तर इतरांना राणे काय वागणूक देतील त्याची कल्पना करा, असे त्या म्हणाल्या.