‘अग्निशामक’ इआरएसएस प्रणालीशी जोडणार

नितीन रायकर : दलाचा ३८ व्या वार्षिक तपासणी दिनानिमित्त परेड


21st February, 11:55 pm
‘अग्निशामक’ इआरएसएस प्रणालीशी जोडणार

अग्निशामक दलाच्या वार्षिक तपासणी दिवस परेडनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आरोग्य सचिव यतींद्र मरळकर, नितीन रायकर व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अग्निशामक दलाला लवकरच ‘११२’ या आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (इआरएसएस) जोडण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पोलीस, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवा एकात्मिक आपत्कालीन हेल्पलाईनद्वारे मिळवता येतील, अशी माहिती संचालक नितीन रायकर यांनी दिली. शनिवारी पणजीत दलाच्या ३८ व्या वार्षिक तपासणी दिवस परेडनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य सचिव यतींद्र मरळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नितिन रायकर पुढे म्हणाले की, परेड दिवस दलाच्या कामकाजाची तयारी, शिस्त आणि कार्यक्षमता यांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याद्वारे आम्ही जीवन, मालमत्ता आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, हे समजते. २०२५ मध्ये दलाला एकूण ८,००२ कॉल आले. यात २,८८९ आगीच्या आणि ५,११३ आपत्कालीन घटनांचा समावेश होता. या दरम्यान १६१ मनुष्य तर ८४२ प्राण्यांचे जीव वाचवण्यात आले. खात्यातर्फे पायभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे.
वाळपई येथे नुकतेच आधुनिक अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिचोली आणि वास्को येथे नवीन अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू आहे. यामुळे राज्यभर आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मजबूत होईल. येथील प्रशिक्षण केंद्र विविध राज्यांमधील अधिकाऱ्यांसाठी व्यापक जनजागृती उपक्रमांसह प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे. आतापर्यंत हजारो नागरिक, शालेय शिक्षक आणि युवा अपदा मित्रांना अग्निसुरक्षा आणि आपत्ती तयारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही रायकर यांनी सांगितले.
तंदुरुस्ती कायम राखून सेवा करा
अग्निशामक दलातील जवानांचे धैर्य, समर्पण व अथक परिश्रमामुळे गोवा राज्य अधिक मजबूत आणि सुरक्षित आहे. दलाच्या जवानांनी आपली तंदुरुस्ती कायम राखून राज्याची सेवा करत राहावी, असे आवाहन आरोग्य सचिव यतींद्र मरळकर यांनी केले.
अग्नीसुरक्षा भत्त्याबाबत प्रस्ताव
रायकर यांनी सांगितले की, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना अग्नीसुरक्षा भत्ता (रिस्क अलाउन्स) देण्याबाबत आम्ही सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. याबाबत सरकारचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे हा भत्ता लवकरच मिळणार आहे.             

हेही वाचा