विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीसाठी इकोसिस्टिम गरजेची

विचारवेध व्याख्यानमाले डॉ. रजत तालक यांचे मत


21st February, 11:59 pm
विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीसाठी इकोसिस्टिम गरजेची

व्याख्यानमालेत विचार मांडताना डॉ. रजत तालक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : गोव्यातील वातावरण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी पोषक आहे. याठिकाणी उच्च शिक्षण संस्थांमधून रिसर्च होण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. काही नव्या चांगल्या संस्थांची निर्मितीही आवश्यक आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी तशी संस्कृती जोपासण्याची व इकोसिस्टिम तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. रजत तालक यांनी केले.
गोमंत विद्या निकेतनतर्फे आयोजित फोमेंतो पुरस्कृत विचारवेध व्याख्यानमालेत शनिवारी डॉ. रजत तालक यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रजत सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये साहाय्यक प्राध्यापक आहेत. रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ते प्रगत संशोधक मानले जातात. डॉ. रजत म्हणाले, शून्याच्या शोधापासूनची सुरू झालेली प्रगती सुरूच आहे. परिस्थितीनुसार बदल स्वीकारणे गरजेचे असते. सर्वसामान्य व्यक्तीकडूनही नवनिर्मिती होऊ शकते. त्यासाठी योग्य दिशा व मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. रोबोंची निर्मिती ही वेगळी गोष्ट असून आता एआयमध्ये बौद्धिक विचारांची क्षमता आहे.
गोवा हे प्रगतशील राज्य असून विविध शैक्षणिक संस्थांमुळे मुलांना चांगले शिक्षण घेण्याची संधी आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विचार करताना ग्रामीण भागाचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. चांगल्या संस्था असूनही आवश्यक रिसर्च होत नाही, तर कार्यपद्धतीत बदल आवश्यक आहे. चांगल्या शैक्षणिक संस्था येण्याची किंवा चांगल्या संस्थांशी करार करून संस्था अपग्रेड करून शिक्षणाच्या सीमा विस्तारण्याची गरज आहे. कृषी व पर्यटनात तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे, असेही डॉ. रजत म्हणाले.
मुलांना क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्या!
शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. उच्च शिक्षणाच्या कालावधीत दबाव असणे हे नवे नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करून मुलांना वेळीच अनुचित प्रकारापासून दूर केले जाऊ शकते. पालकांनी मुलांना ज्या क्षेत्रात काम करायचे असेल त्यात काम करू द्यावे. त्यांना चौकटीत न ठेवता विचाराचे व क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असेही डॉ. रजत म्हणाले.

हेही वाचा