ग्रामसभेत ठराव : पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी

ग्रामसभेत प्रश्न मांडताना माजी सरपंच इनासियो डिसोझा. व्यासपीठावर सरपंच सुशांत गावडे व पंच.
...
वार्ताहर। गोवन वार्ता
हरमल : पंचायत क्षेत्रातील मसाज व स्पा पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय होत असल्याने पर्यटन स्थळाचे नाव बदनाम होत आहे. गावात मसाज व स्पा पार्लरवर बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुशांत गावडे होते. प्रारंभी सचिव रजत नार्वेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. मात्र मंजुरी देण्यास ग्रामस्थांनी हरकत घेऊन रोखून धरली.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजलीचा ठराव माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी मांडला. ग्रामसभा आचारसंहितेनंतर तीन महिन्यांनी घेण्याचे कारण काय, असे टोनी डिमेलो यांनी विचारले. यावर सचिव व सरपंच गडबडले. भटवाडी कोरगाव प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण रखडल्यास नागरिकांना मनस्ताप सोसावा लागेल. सध्या धुळीमुळे नागरिकांना या रस्त्यावरून फिरणे असह्य झाले आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली.
ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील कर आकारणीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. गावातील आस्थापनांची नोंदणी शुल्क वसुली करण्याचे ठरले. पार्किंग जागेतील कचरा अस्ताव्यस्त विखुरला असून तो उचलण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून शुल्क आकारणी करण्याची सूचना करण्यात आली. पंचायत खात्यात निधी नसल्याने कर आकारणी महत्त्वाची आहे, असे सरपंच गावडे यांनी सांगितले.
ग्रामसभेला उपसरपंच सोनाली माज्जी, पंच अनुपमा मयेकर, संतान फर्नांडिस, प्रजॉय फर्नांडिस, दिव्या गडेकर, गुणाजी ठाकूर, भिकाजी नाईक व रजनी इब्रामपुरकर तसेच गटविकास खात्याचे जितेंद्र तिळवे उपस्थित होते. ग्रामसभेतील चर्चेत टोनी डिमेलो, एडविन डिसोझा, इनासियो डिसोझा, बॉस्को फर्नांडिस, जॉकी रड्रिग्ज, क्लाऊड फर्नांडिस, रफाएल फर्नांडिस, संतान फर्नांडिस, मार्सेलीन फर्नांडिस, संतोष कोरकणकर, मॅथ्यू फर्नांडिस, हेमंत फर्नांडिस आदींनी भाग घेतला. प्रजॉय फर्नांडिस यांनी आभार मानले.
गावाच्या रक्षणासाठी तत्पर राहण्याचे आवाहन
भटवाडी भागातील जमीन रूपांतरणास प्रखर विरोध करून ग्रामस्थ, व पंचायत मंडळ व समाजसेवी व्यक्तींनी सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे. गावाच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर राहून कार्य करूया, असे आवाहन आत्माजी नाईक यांनी केले.
व्यावसायिकांची सतावणूक करू नका : प्रजॉय फर्नांडिस
पंचायत क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसाय परवाना न देता, तात्पुरता दाखला दिला जातो. त्या दाखल्याची वैधता कुठेच होत नाही. त्यामुळे केवळ नूतनीकरण दाखला देऊन सोय करावी. मात्र सध्याच्या नियमानुसार आवश्यक बांधकाम परवाना, उतारा व अन्य दाखले कोणाकडेच नाहीत. त्यासाठी फायली अडवू नका, असे आवाहन पंच प्रजॉय फर्नांडिस यांनी केले.