एकाला अटक : संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान एका व्यक्तीने घुसण्यासाठी केलेला प्रयत्न वास्को पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे फसला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी मूळचा बेळगावचा परंतु सध्या वरुणापुरी-मांगोरहिल येथे राहणारा रायप्पा चन्नाप्पा श्रीरागणवी (५०) याला अटक केली. त्याने बँकेमध्ये चोरी करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात उभे केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जोशी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेनजीकच्या रेल्वे स्थानकाजवळ पोलीस रात्रीची नियमित गस्त घालत होते. पथकाला बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूने काहीतरी आवाज आला. त्यामुळे पथकाचा सशंय बळावला. त्यानी मागील बाजूस जाऊन पाहिले असता, एक व्यक्ती बँकेच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीच्या ग्रिलला धरून बसली होती. काळी टोपी, हिरवा बिनबाह्याचा टी शर्ट, निळी ट्रॅक पँट त्याने घातली होती. पोलिसांना पाहताच त्याने त्याच्याकडील प्लास्टिकच्या पिशवीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची पिशवी तपासली. पिशवीमध्ये काळ्या इन्सुलेशन टेपमध्ये गुंडाळलेला लाल टॉर्च, हॅँडलसह एक हेक्सॉ-ब्लेड आदी साहित्य मिळाले. चौकशी केली असता त्याने चोरीसाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँक फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी
जानेवारी २०२६ मध्ये कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक वैभव नाईक यांनी बँकांभोवती रात्रीची गस्त ठेवली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोमवारी बँक फोडण्याचा प्रयत्न फसला. अधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्लेटो कार्वोलो, हवालदार संतोष भाटकर, पुरुषोत्तम नाईक, शिपाई व्यंकट गवंडर, संगमेश बिरादार, संतोष नाईक, अनिल जाधव, आशिष आरोलकर यांनी कामगिरी बजावली.