पक्षांसमोर नवे आव्हान : ४,२३० मतदार कमी झाल्याने बदलणार राजकीय समीकरणे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेष म्हणजे एसआयआर प्रक्रियेनंतर फोंडा मतदारसंघातील तब्बल ४,२३० मतदार कमी झाले असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गत निवडणुकीतील मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसमधील उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे. कमी झालेल्या मतदारसंख्येचा विचार करून सर्वच पक्ष आणि संभाव्य उमेदवारांना नवी रणनीती आखावी लागणार आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. एसआयआरनंतर पर्ये मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघांतील मतदारसंख्या कमी झाली आहे. राज्यातील २४ मतदारसंघांत तरी २,००० पेक्षा अधिक मतदार कमी झाले आहेत.
मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने तसेच मतविभागणीच्या शक्यतेमुळे फोंडा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. बदललेल्या मतदारसंख्येमुळे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. मागील निवडणुकीत सुरुवातीला केवळ एका मताने विजय मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली होती. त्यात रवी नाईक ७७ मतांनी विजयी ठरले होते.
फोंडा मतदारसंघातील मतदारसंख्या
२०२२ मध्ये मतदारसंख्या : ३२,१५७
एसआयआरनंतर मतदारसंख्या : २७,९२७
एकूण घट : ४,२३०
२०२२ च्या निवडणुकीत उमदेवारांना मिळालेली मते
रवी नाईक (भाजप) : ७,५१४
डॉ. केतन भाटीकर (मगो) : ७,४३७
राजेश वेरेकर (काँग्रेस) : ६,८३९
सानिश तिळवे (आरजी) : १,७७०
काँग्रेसच्या उमेदवारीबाबत उत्सुकता
सध्या मगो पक्ष सत्तेत असल्याने भाजप-मगो युतीचा एकच उमेदवार असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे राजेश वेरेकर इच्छुक असतानाच डॉ. केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उमेदवारीवरून पक्षात अंतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे.