विजय सरदेसाई यांचा ढोंगीपणा लवकरच उघड करणार : मनोज परब

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
24th February, 04:27 pm
विजय सरदेसाई यांचा ढोंगीपणा लवकरच उघड करणार : मनोज परब

पणजी : विजय सरदेसाई नगर नियोजन (TCP) मंत्री असताना १६ ब द्वारे राज्यातील जमीन क्षेत्र बदल, रूपांतरण सुरू झाले होते. आजचे ३९ अ हे त्याचेच वेगळे स्वरूप आहे. याआधी विधानसभेत (Assembly) ३९ अ ला विरोध झाल्यावर देखील ते अनुपस्थित राहिले. यावरुन त्यांचा खोटारडेपणा समजून येतो. लवकरच आम्ही त्यांचा ढोंगीपणा उघड करणार असल्याचे आरजीपी (RGP) अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

परब म्हणाले की, याआधी चिंबल येथे मोठे आंदोलन झाले होते. तिथेही विजय सरदेसाई उपस्थित राहिले नाहीत. काल त्यांनी आपण गुरे नाहीत असे म्हटले. एकूणच आता कोण कुणाचे मित्र आहे, कोण जमिनींचे (Land)  व्यवहार करतो, कोण रिअल इस्टेट क्षेत्रात काम करतो हे सर्वांना समजले आहे. खरे आणि खोटे गोमंतकीय कोण हे देखील लोकांना समजले आहे. विरोधी आमदार म्हणून आम्ही अनेकवेळा शांत बसलो होतो. मात्र; यापुढे आम्ही गप्प राहणार नाही. 

आमदार सरदेसाई यांनी गोमंतकीय गुरे आहेत का ते सांगावे. काल शेकडो लोक चालत मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यावर गेले होते. यामध्ये महिला, एसटी समाजातील लोक होते. सरदेसाई यांना देखील गुरे समजतात का हे स्पष्ट करावे. तसे पाहायचे तर गुरे आपल्या मालकाशी प्रामाणिक असतात. गुरांना किंमत असते. सरदेसाई यांनी सुरू केलेला खोटारडेपणा आजही कायम आहे आणि भविष्यात देखील तसाच राहील असा आरोप परब यांनी केला. 

उपोषण सुरूच राहील 

परब यांनी सांगितले की, ३९ अ रद्द करावा यासाठी उपोषण करणाऱ्या आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती रात्री खालावली होती. खाजगी रुग्णालयात उपच केल्यावर ते आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आम्हाला प्रश्न कायमचा सोडवायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन बोरकर यांची भेट घेणे आवश्यक आहे.


हेही वाचा