बीएसएनएल संचालकांचा प्रयागराज दौरा वादात

‘शाही’ प्रोटोकॉलनंतर कारणे दाखवा नोटीस

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th February, 08:47 pm
बीएसएनएल संचालकांचा प्रयागराज दौरा वादात

नवी दिल्ली : ​बीएसएनएलचे संचालक विवेक बंसल यांच्या प्रयागराज येथील नियोजित दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अधिकृत आदेशात या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चिक आणि कथित ‘शाही’ व्यवस्थेचा उल्लेख असल्याने टीकेची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारत संचार नियम लिमिटेडचे संचालक विवेक बंसल १९ फेब्रुवारीला प्रयागराज दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्याचा प्रोटोकॉल व्हायरल झाला. 

५० हून अधिकाऱ्यांची नेमणूक

विवेक बंसल यांच्या दौऱ्यासाठी ५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. बंसल यांचे टॉवेल, अंडरवेअर सांभाळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. या शाही बडदास्तीची दखल आता केंद्राकडून घेण्यात आली आहे. बंसल यांच्या दौऱ्यासाठीचा प्रोटोकॉल वादात सापडला आहे. बंसल यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यांना ७ दिवसांत उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंसल यांनी कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. बंसल यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

प्रोटोकॉल वादात

१९ फेब्रुवारीला बीएसएनएलचे संचालक प्रयागराज दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठी डीजीएम स्तरापर्यंत एक प्रोटोकॉल जारी करण्यात आला होता. बंसल यांच्या दौऱ्याचे अगदी काटेकोर नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मिनिट टू मिनिट योजना आखण्यात आली होती. बंसल यांच्या आगमनापासून संगम स्नान, स्नानासाठी वापरले जाणारे कपडे, टॉवेल, भोजन आणि दिनक्रमाशी संबंधित लहान-मोठ्या गोष्टींसाठी विविघ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यासाठी ५० अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रोटोकॉलच्या अंतर्गत ५० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्नानानंतर कोणतीही वस्तू, मग ते टॉवेल असो वा अन्य खासगी वस्तू मागे राहू नयेत, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

हेही वाचा