सावईवेरेचा ‘अनंत’

सावईवेरे गावातील देव श्री मदनंत मंदिरात वर्षभर उत्सव चालू असतात. विशेष म्हणजे वर्षाचे बाराही महिने चंदनाने रंगवण्यात आलेली गंधपूजा हे या मंदिरातील आकर्षण असते. वर्षातून एकदा येणारा ‘सख्या हरीकाला’ हा गाेमंतकातील मंदिरातून साजरा हाेणारा एकमेव उत्सव.

Story: जत्रा |
26th February, 05:31 pm
सावईवेरेचा ‘अनंत’

सावईवेरे गावचा देव श्री मदनंत हा एक दैवी चमत्कार आहे. पूर्वी द्वारकानगरीतून गाेपीचंदनाची विक्री करणारी गलबते काेचीन बंदरात येत असत. श्रीकृष्णासाेबत गाेपी जलक्रीडा करणारा तलाव द्वारकेमध्ये ‘गाेपी तलाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण ज्यावेळी वृंदावन साेडून द्वारकानगरीत आले, त्यावेळी गाेपी खूप दु:खी झाल्या. त्यांना वृंदावनात कसेच करमेना. गाेपीच्या आठवणींनी ताे बैचन झाला. गाेपी तर मदनाच्या जलक्रिडेच्या आठवणींनी वेड्या झाल्या. त्यांना विरह सहन हाेईना, हे जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात आले त्यावेळी त्यांनी द्वारकेमध्ये एक माेठा तलाव निर्माण केला. जलक्रिडेसाठी गाेपी तिथे येऊ लागल्या. गाेपी व भगवंताच्या जलक्रिडेनंतर पाण्याला सुवासिक वास येऊ लागला. त्यात असलेली माती सुंगधित झाली. गाेपीचंदन नावाने प्रसिद्ध झालेली ही माती लाेक पवित्र माती मानून शुभकार्याच्या वेळी कपाळाला टिळा लावून घेऊ लागले. गाेपी व कृष्ण यांच्या भक्तीचे व एकमेकांवरील अमाप प्रेमाचे प्रतीक म्हणजे गाेपीचंदन. पुढे द्वारकेहून गाेपीचंदन घेऊन व्यापारी त्याची विक्री करू लागले. अशाच एका गाेपीचंदनाने भरलेल्या नाैकेत तळाशी बसून कुणालाही कल्पना नसताना भगवान श्री विष्णू शेषशाई मदनंत आपल्या सर्व कुटुंबासह जलप्रयाणाला निघाले आणि सावईवेऱ्याला दाखल झाले. ताे हाच सख्याहरीचा दिवस. येथे नाचणाऱ्या सख्याहरीचा चमत्कार काय वर्णावा. देव आल्याची बातमी सर्व गावात वाऱ्यासारखी पसरली. देव आल्याची बातमी समजताच गावातील लाेक हाताला जे काही मिळेल ते घेऊन नाचू लागले. घरात असलेले ढाेल, ताेशे, नगारे, तुताऱ्यांचे स्वर आसमंतात घुमू लागले. सावईवेरे हा कुळागरी भाग. कुळागारात परसात असलेली सुपारीची राेपे उपटून जशी झेपेल तशी खांद्यावर घेऊन नाचू लागले.

हरी रे माझ्या पांडुरंगा,

सख्या हरी, माझ्या पाडुरंगा...

‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीप्रमाणे येथे पाषाणावर भगवंताचा सर्व परिवार शेषावर आरुढ झालेल्या मदनंतासह पहावयास मिळताे. शेषशायी श्री अनंताच्या नाभीकमलातून कमलपुष्पावर विराजमान झालेली ब्रह्मदेवाची मूर्ती ब्रम्हांडीची रचना करणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही दैवतांचा मिलाफ येथे दिसून येताे. श्री अनंत म्हणजेच भगवान विष्णू त्यांच्या चरण कमलापाशी बसून असलेली श्री देवी लक्ष्मी, भगवंताचा आठवा अवतार श्रीकृष्ण, त्याचे पितामह वासुदेव, कंसाने शिशू अवस्थेत यमसदनी पाठवलेले कीर्तिमान, सुसेना, उदायीन, भद्रसेन, रिजुदास हे पुत्र व त्यांच्या वियाेगाने आक्राेश करणारी माता देवकी. तुझा शुत्रू गाेकुळात वाढत असल्याची तंबी देऊन कंसाच्या हातून निसटून गेलेली माया. या सर्व मूर्ती येथे पहावयास मिळतात. विष्णूचे दहा अवतार, वाहक सेवक हनुमंत यांनाही वगळण्यात आलेले नाही.

मंदिरातून वर्षभर उत्सव चालू असतात. विशेष म्हणजे वर्षाचे बाराही महिने चंदनाने रंगवण्यात आलेली गंधपूजा हे या मंदिरातील आकर्षण असते. वर्षातून येणारा सख्या हरीकाला हा गाेमंतकातील मंदिरातून साजरा हाेणारा एकमेव उत्सव.

नाैकाविहार, गरुडासन, विजयरथ, सिंहासन, हत्ती अंबारी, शेषासन असे विविध उत्सव असतात. उत्सव सतत आठ दिवस चालताे. पहिल्या दिवशी सख्याहरीचा नवस केलेले स्वेच्छेने नाचणारे हजाराे लाेक असतात. त्यानंतर विशेष गर्दीचा दिवस म्हणजे विजयरथ. वेरेकर महाजन बंधूंचा हा उत्सव आहे. गाेमंतकात विखुरलेले सर्व वेरेकर बांधव जत्रेच्या निमित्ताने आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन घेतात.

मंदिरातून विविध धार्मिक विधी चालू असतात. हाेमवहन, विष्णू याग, महानैवेद्य आदी कार्यक्रम असतात. रात्री सुगम संगीताची मैफल असते. श्रीदेवी व भूदेवी यांच्या मधाेमध असलेली श्री अनंताची उत्सवमूर्ती घाेड्याच्या रथात बसवून मंदिराभाेवती मिरवणूक काढतात. रथ फुलांनी सुशाेभित केलेला असतो. परिसर खुलून जाताे. या दिवसात सावईवेरे गाव नववधूसारखा सजलेला असताे. दारादारांत फळाफुलांनी सजवलेली ताेरणे मन आकर्षित करतात. अशाप्रकारे मार्गशीर्ष शु. तृतीयेपासून चाललेल्या सख्याहरीची मा. शु. दशमीच्या दिवशी सांगता हाेते.

हेही वाचा