दिव्यांग उमेदवारांसाठी पुन्हा घेतली जाणार कौशल्य चाचणी

दिव्यांग आयोगाच्या शिफारशीनंतर गोवा कर्मचारी भरती आयोगाचा निर्णय

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th February, 05:37 pm
दिव्यांग उमेदवारांसाठी पुन्हा घेतली जाणार कौशल्य चाचणी

पणजी : कनिष्ठ लिपिक (LDC) पदासाठी दिव्यांग गटातील १३ उमेदवारांची पुन्हा एकदा कौशल्य चाचणी (Skill Test) घेण्याचा निर्णय गोवा कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. दिव्यांग आयोगाने या उमेदवारांसाठी फेरचाचणी घेण्याची शिफारस केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

आता ही कौशल्य चाचणी गोवा शालान्त मंडळाद्वारे ७ मार्च २०२६ रोजी घेतली जाणार आहे. एलडीसी आणि रिकव्हरी क्लार्क पदांसाठी आयोगाने २०२४ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. संगणक आधारित परीक्षा (CBT) झाल्यानंतर उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाते. दिव्यांग उमेदवारांची चाचणी इतर उमेदवारांसोबतच पार पडली होती, परंतु दिव्यांग श्रेणींत वेगवेगळे डिसेबिलिटी बेंचमार्क असल्याने आणि तांत्रिक बाबींचा विचार करून दिव्यांग आयोगाने काही उमेदवारांसाठी फेरचाचणीची शिफारस केली होती. त्यानुसार, आता हे १३ उमेदवार पुन्हा चाचणी देतील.

आयोगाने स्पष्ट केले आहे की, या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी वेगळी गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केली जाणार नाही. दिव्यांग गटात जी मूळ गुणवत्ता यादी आधीच जाहीर झाली आहे, त्यामध्येच उत्तीर्ण उमेदवारांचा समावेश केला जाईल.