
शुक्रवारी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी नवे चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होत आहेत. थरार, गुन्हेगारी, क्रीडा आणि मानसशास्त्रीय नाट्य अशा विविध धाटणीचे दमदार पर्याय रसिकांसाठी सज्ज आहेत.
फॉर्म्युला १: ड्राइव्ह टू सर्व्हाईव्ह : सिझन ८ । नेटफ्लिक्स
फॉर्म्युला १ या लोकप्रिय क्रीडा माहितीपट मालिकेचा आठवा सिझन २०२५ मधील रोमांचक रेसिंग हंगाम उलगडतो. या सिझनमध्ये लॅंडो नॉरिस याच्या विजेतेपदाची कहाणी, ख्रिश्चन हॉर्नर याचा रेड बुलमधून झालेला निरोप आणि लुईस हॅमिल्टन याचा फेरारीकडे झालेला प्रवास दाखवण्यात आला आहे. हंगामाचा शेवट मॅक्स व्हर्स्टॅपन, ऑस्कर पियास्त्री आणि नॉरिस यांच्यातील चुरशीच्या स्पर्धेने होतो.

सीक्रेट स्टोरीज: रोसलिन । जिओहॉटस्टार
ही मल्याळम भाषेतील मानसशास्त्रीय थरारक मालिका रोसलिन (संजना दीपू) या किशोरीभोवती फिरते. तिला वारंवार हिरव्या डोळ्यांच्या अनोळखी व्यक्तीचे भयानक स्वप्न पडते. तिच्या स्वप्नातील व्यक्तीप्रमाणे दिसणारा जेरी (हक्किम शाह) जेव्हा तिच्या घरी येतो, तेव्हा स्वप्न आणि वास्तव यांची सीमारेषा धूसर होते.

मोनार्क: लेगसी ऑफ मॉन्स्टर्स : सिझन २ । अॅपल टीव्ही
पहिल्या सिझननंतर दोन वर्षांनी घडणारी कथा रांडा कुटुंबाच्या पुनर्मिलनाभोवती फिरते. स्कल आयलंडवरील संशोधन केंद्रात त्यांना नव्या धोक्याचा सामना करावा लागतो. टायटन एक्स या प्रकाशमान आणि भीषण शक्तीचा उदय परिस्थिती अधिकच गंभीर करतो. या सिझनमध्ये मॉनार्क संस्थेची बदलती भूमिका आणि तिचे वाढते संघर्ष दाखवले आहेत.

अॅक्यूज्ड । नेटफ्लिक्स
हा प्रभावी मानसशास्त्रीय थरारपट डॉ. गीतिका (कोंकणा सेन शर्मा) हिच्या आयुष्यावर आधारित आहे. लंडनमधील एक नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या गीतिकावर अनामिक सहकाऱ्याकडून गैरवर्तनाचा आरोप केला जातो. या आरोपांमुळे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठे वादळ निर्माण होते. तिची पत्नी डॉ. मीरा (प्रतिभा रांटा) हिच्याशी नातेसंबंध ताणले जातात आणि दत्तक प्रक्रियेवरही परिणाम होतो.

थडयम । झी५
तामिळ भाषेतील हा गुन्हेगारी थरारपट उपनिरीक्षक अधियामन (समुथिराकानी) यांच्या तपासावर आधारित आहे. तामिळनाडू–आंध्र प्रदेश सीमारेषेवर घडणाऱ्या रहस्यमय खुनांच्या मालिकेमागील भयानक पद्धतीचा तो शोध घेतो. वेळ कमी असताना गुंतागुंतीचे रहस्य उलगडण्यात तो यशस्वी होईल का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते.