पैशांच्या हव्यासातून पतीने केली पत्नीची हत्या

साळगाव-मुड्डावाडो येथील घटना : संशयिताने दिली गुन्ह्याची कबुली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th February, 06:29 pm
पैशांच्या हव्यासातून पतीने केली पत्नीची हत्या

पणजी : साळगावच्या मुड्डावाडो परिसरात एका भाड्याच्या खोलीत शुक्रवारी रक्ताचा सडा पडला. किरकोळ वाटणाऱ्या घरगुती वादाचे रूपांतर अशा काही भीषण क्रूरतेत होईल, याची कल्पनाही शेजाऱ्यांना नव्हती. पैशांच्या हव्यासातून आणि सततच्या वादातून पतीने आपल्याच पत्नीचा सुरीने गळा चिरून खून केला. या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे, हत्या केल्यानंतर पतीने पलायन न करता रक्ताने माखलेल्या कपड्यांनिशी थेट पोलीस स्थानक गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.



संशयित विनोद भालचंद्र राठोड (४०, मूळ रा. गदक, कर्नाटक) हा साळगाव येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि त्याची पत्नी रुक्मिणी (३६) यांच्यात गेल्या काही काळापासून पैशांच्या व्यवहारावरून तीव्र मतभेद होते. शुक्रवारी सकाळी घरातील तिन्ही मुले शाळेत गेली होती. घरात कुणीही नव्हते. दोघांमध्ये पुन्हा पैशांवरून जुंपली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात विनोदने घरातील धारदार सुरी उचलली आणि रुक्मिणीचा गळा चिरला. रुक्मिणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


हत्येचे हे क्रूर कृत्य केल्यानंतर विनोदने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने थेट साळगाव पोलीस स्थानक गाठले आणि तेथील पोलिसांना सांगितले, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मला अटक करा. हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले. तातडीने पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक दिनेश गडेकर आणि उपअधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे रुक्मिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.


Murder, Mayhem and Torture” Off the Sunset Strip: The Tragic Story of the  Budding Director and His Dead Girlfriend


पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे साळगाव परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका बाजूला बापाने केलेली क्रूर हत्या आणि दुसऱ्या बाजूला माऊलीचे हरपलेले छत्र, अशा कात्रीत सापडलेल्या तीन निरागस मुलांच्या भविष्याचा विचार करून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून विनोद राठोडला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा