पार्से येथील श्री भगवती देवस्थानचा कौतुकास्पद निर्णय

पेडणे : पार्से येथील श्री भगवती देवस्थान येथे शिगमोत्सवानिमित्त शेकडो वर्षांपासून आंब्याच्या पूर्ण झाडाची होळी घालण्याची परंपरा चालत आली होती. मात्र यावर्षी पर्यावरणाचे भान ठेवत देवस्थान समितीने या परंपरेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण आंब्याचे झाड तोडण्याऐवजी केवळ त्याची एक फांदी होळी म्हणून वापरण्यात येणार आहे. देवस्थानाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत होत आहे.
याबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप देसाई व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पारंपरिक पद्धतीनुसार होळी साजरी करण्यासाठी दरवर्षी गावातील एक आंब्याचे झाड पूर्णपणे कापावे लागत होते. परिणामी, दरवर्षी एक झाड नष्ट होत असल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत होती. ही बाब लक्षात घेऊन समितीने परंपरा कायम ठेवत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
शेकडो वर्षांची परंपरा जपत असताना पर्यावरणाचेही रक्षण व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे यापुढे पूर्ण झाड न कापता त्याची एक फांदी होळी म्हणून वापरण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील इतर देवस्थानांनीही हा निर्णय योग्य वाटल्यास अशाच प्रकारे झाडांची तोड टाळून फांदीचा वापर करावा, जेणेकरून परंपराही टिकेल आणि पर्यावरणाचे संवर्धनही होईल, असे आवाहन त्यांनी केले.
आदर्शवत निर्णय
आगरवाडा येथील श्री सातेरी देवस्थान आणि पार्से येथील श्री भगवती देवस्थानात अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्याची प्रथा आहे. त्यानुसार पार्से येथून आगरवाडा येथे आंब्याच्या झाडाची होळी देण्याची परंपरा देखील सुरू आहे. यावर्षी पार्से देवस्थान समितीने आगरवाडा येथील श्री सातेरी देवस्थानाकडे पूर्ण झाड न नेता त्याऐवजी आंब्याची फांदी स्वीकारावी, अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारा हा निर्णय इतरांसाठीही आदर्श ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.