मध्यपूर्वेत तणाव शिगेला; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये ४० जण ठार

इराणचे प्रत्युत्तर; अनेक देशांनी हवाई क्षेत्र केले बंद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28th February, 06:16 pm
मध्यपूर्वेत तणाव शिगेला; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये ४० जण ठार

तेहरान : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला असून; अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) यांनी इराणवर (Iran) संयुक्त हल्ले केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरा दाखल हल्ले केले आहेत. इराणने अमेरिकेच्या कुवे (Kuwait), कतार, युएई (UAE), जॉर्डन (Jordan) येथील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलवरही प्रतिहल्ले केल्याचा दावा इराणने केला आहे. 

अमेरिका-इस्रायलचे संयुक्त हल्ले दक्षिण इराणमधील मुलींच्या शाळेवर झाल्याने, त्यात ४० जण मृत्यूमुखी पडले आहेत.  एकूण या स्थितीमुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्र बंद केली आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इस्रायलच्या कारवाईला अमेरिकेचा पाठिंबा असल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेचा “पूर्णपणे नायनाट करू” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

प्रतिहल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये सतर्कता

तेहरानकडून प्रतिहल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये देशव्यापी इशारा जारी करण्यात  आला आहे. इराणकडून डागण्यात आलेली काही क्षेपणास्त्रे हवेतच रोखण्यात आल्याचा दावा  इस्रायली लष्कराने केला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवाई क्षेत्र बंद, उड्डाणे रद्द

तणाव वाढल्यानंतर इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद केले आहे. तसेच इराकनेही खबरदारीचा उपाय म्हणून हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले. अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी संबंधित देशांकडे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.

तेहरानमध्ये संचार व्यवस्था विस्कळीत

तेहरानच्या काही भागांत मोबाईल सेवा आणि इंटरनेट सेवा खंडित झाली आहे.  इस्रायलमध्ये शाळा आणि कार्यालये तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून काही ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

खामेनेई सुरक्षित स्थळी

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, स्फोटांचे आवाज इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ ऐकू आले. मात्र, हल्ल्यावेळी ते कार्यालयात उपस्थित नव्हते आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

इस्रायलमधील भारतीयांसाठी सल्ला

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक नसल्यास बाहेर पडू नये आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्यपूर्वेतील या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील परिस्थितीवर जगाचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा