भारत-वेस्ट इंडिजसाठी ‘करो किंवा मरो’

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ : उपांत्य फेरीचे चित्र आज होणार स्पष्ट

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th February, 11:46 pm
भारत-वेस्ट इंडिजसाठी ‘करो किंवा मरो’

कोलकाता : गतविजेता भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार की नाही, याचा निर्णय रविवार, १ मार्च रोजी होणार आहे. सुपर ८ फेरीतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताचा दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ स्वरूपाचा असून, विजयी संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवेल; तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल.
टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर ८ चा सामना १ मार्चला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. तर ६.३० वा. नाणेफेक होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर व मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
विंडीज वरचढ
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत टी २० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण ४ सामने खेळवण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजने या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभूत केले आहे. तर टीम इंडियाला केवळ १ सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे टीम इंडिया विंडीज विरुद्ध दुसरा विजय मिळवून सेमी फायनलमध्ये धडक देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाबाबत बोलताना शेफर्ड म्हणाला, खरे सांगायचे तर आमच्याकडे पश्चात्ताप करण्यासाठी वेळ नाही. आम्हाला शांत राहून त्या मोठ्या सामन्यासाठी लवकरात लवकर सावरायचे आहे. हा सामना करो किंवा मरोचा आहे आणि आमचे भविष्य आमच्या हातात आहे. आम्ही मैदानात उतरून विजय मिळवू आणि सेमीफायनल गाठू, अशी आशा आहे.
शेफर्डने स्पष्ट केले की त्यांच्या संघाने किमान ५० धावा कमी केल्या. तो म्हणाला, जेव्हा फलंदाज बाद होत होते, तेव्हा ते सांगत होते की विकेट अतिशय चांगली आहे. मी स्वतः मैदानात उतरलो तेव्हाही ती खूप चांगली वाटली. पहिल्या काही चेंडूवर फलंदाजी करताना असे वाटले जणू मी काँक्रीटवर खेळतोय.
सुपर-८ मधील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७३ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयी मालिकेला खीळ बसली. आता वेस्टइंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताला आपली खरी ताकद दाखवावी लागणार आहे.
रिंकू संघात सामील
रिंकू सिंह रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-८ सामन्यापूर्वी शनिवारी कोलकाता येथे भारतीय टी-२० विश्वचषक संघात पुन्हा सामील होईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, रिंकू शनिवारी संघात सामील झाला आहे. शुक्रवारी त्याचे वडील खानचंद सिंग यांचे निधन झाले होते. ते ६० वर्षांचे होते. त्यांना चौथ्या टप्प्यातील यकृताचा कर्करोग होता. रिंकू वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी चेन्नईहून थेट अलीगढला पोहोचला होता, पण आता तो पुन्हा संघात दाखल झाला.
रिंकूने आतापर्यंत स्पर्धेच्या ५ डावांमध्ये २४ धावा केल्या आहेत. हा रिंकूचा पहिलाच विश्वचषक आहे, कारण तो २०२४ च्या स्पर्धेत ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह होता, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले नव्हते.
रिंकू सिंग २४ फेब्रुवारी रोजी चेन्नईहून विमानाने रुग्णालयात पोहोचला होता. त्याला टी-२० विश्वचषकाचे सराव सत्र सोडावे लागले होते. सुमारे ६ तास ते वडिलांसोबत रुग्णालयात होता. त्यानंतर ताे चेन्नईला परत जाऊ लागला. त्याने वडिलांना सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध सामना आहे, मला देशासाठी खेळावे लागेल.
तेव्हा वडिलांनी रिंकू सिंगच्या डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तू एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचशील. स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक वडिलांना मिळो.
वेस्ट इंडिजचा संघ
शाई होप (कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकेल होसीन, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमॅरियो शेफर्ड
भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
सामना रद्द झाला तर…
भारत वेस्ट इंडिज सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण होतील. अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचा संघ ठरवला जाईल. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड होऊ शकतो. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा भारतापेक्षा चांगला आहे. वेस्ट इंडिजचे सध्या २ गुण आणि नेट रनरेट हा +१.७९१ आहे. तर भारताचे २ गुण आणि नेट रनरेट हा -०.१०० इतका आहे. त्यामुळ वेस्ट इंडिजला फायदा होईल. भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना ७६ धावांनी गमवला होता. तर झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे नेट रनरेट काही सुधारता आला नाही. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडू नये आणि सामना व्हावा, अशी प्रार्थना क्रीडाप्रेमी करत आहेत.
कोलकात्यातील हवामान
कोलकात्यात रविवारी पाऊस पडणार नाही. कोलकात्यात दिवसा सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असेल. संध्याकाळीही पावसाची शक्यता नाही. तर तापमान ३४ अंश सेल्सिअस असेल. सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे आणि नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. सध्या पावसाची शक्यता नाही. म्हणजेच ईडन गार्डन्सवर पूर्ण सामना होईल.
आजचा सामना
भारत वि. वेस्ट इंडिज (सुपर-८)

वेळ : सायं. ७ वा.
स्थळ : इडन गार्डन, कोलकाता
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार
भारत कसा पात्र ठरू शकतो?
समीकरण १ : भारत जिंकला तर : भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, तर सुपर-८ मधील तीन सामन्यांत चार गुणांसह तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
समीकरण २ : भारत हरला तर : भारताचा पराभव झाल्यास त्यांचा प्रवास येथेच संपेल आणि वेस्ट इंडिज पुढे जाईल.
समीकरण ३ : सामना पावसामुळे रद्द : जर पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, तर दोन्ही संघांचे तीन गुण होतील. मात्र चांगल्या नेट रन रेटमुळे वेस्ट इंडिजला सेमीफायनलचे तिकीट मिळेल आणि भारत स्पर्धेबाहेर जाईल.