दुरुस्तीनंतरही सांकवाळ-कुठ्ठाळी रस्ता खचला

शंकर पोळजींकडून बॅरिकेड्समुळे अपघाताची भीती व्यक्त


2 hours ago
दुरुस्तीनंतरही सांकवाळ-कुठ्ठाळी रस्ता खचला

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स, सिमेंट काँक्रिटला पडलेल्या भेगा व खचलेला भाग.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सांकवाळ-कुठ्ठाळी मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतरही सदर रस्ता खचल्याने, तसेच सिमेंट काँक्रिटला भेगा पडल्याने, सिंमेंट काँक्रिट उखडले गेल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी आठ दिवस तेथे बॅरिकेड्स उभारण्यात आल्याने तेथे अपघाताची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. अल्प दुरुस्तीच्या नावाखाली आणखी किती दिवस रस्ता बंद ठेवणार, असा सवाल त्यांनी केला आहे. याप्रकरणाची सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सदर रस्त्यावर खड्डा तयार झाल्याने तो बुजविण्याचे काम आठ दिवसांपर्वी हाती घेण्यात आले होते. खड्डा बुजविण्यासाठी तेथे सिमेंट काँक्रिटचा वापर करण्यात आला होता. तेथे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. तथापि सिमेंट काँक्रिट घातल्यावर त्याला भेगा पडल्या आहेतच, शिवाय दुरुस्ती केलेला रस्ता एका बाजूला खचला गेला आहे.
दाबोळी ते वेर्णा तिठा महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने ती वाहने कुठ्ठाळी –सांकवाळ मार्गाने पुढे जातात. त्यामुळे सांकवाळ–कुठ्ठाळी मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सांकवाळ-कुठ्ठाळी येथे दुरुस्तीच्या नावाखाली गेले आठ दिवस बॅरिकेड्स उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याची योग्यरीत्या दुरुस्ती करून बॅरिकेड्स हटविण्याची गरज आहे.       

हेही वाचा