सावईवेरे भागात रात्रीच्या वेळी रेती उपशाचे प्रमाण वाढले

स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा : अवैध रेती व्यवसायामुळे गुन्हे घडण्याची भीती


2 hours ago
सावईवेरे भागात रात्रीच्या वेळी रेती उपशाचे प्रमाण वाढले

मधलावाडा-सावईवेरे येथे पाहणी करताना पोलीस निरीक्षक योगेश सावंत. सोबत इतर पोलीस कर्मचारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : मधलावाडा-सावईवेरे आणि पाळीच्या मध्य भागात असलेल्या नदीवर मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्याचा प्रकार रात्रीच्या वेळी दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री स्थानिकांनी बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली. भविष्यात गावाजवळ रेती उपास केल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावईवेरे भागातील लोकांनी दिला आहे. शनिवारी सकाळी म्हार्दोळ पोलिसांनी नदीजवळ जाऊन पाहणी केली.
मधलावाडा-सावईवेरे येथे शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास अंदाजे ३० ते ४० होड्या स्थानिक लोकांना नदीत दिसून आल्या. पंपद्वारे होडीत नदीतील रेती उपसा करण्यात येत होता. त्यामुळे स्थानिकांनी एकत्रित येऊन नदीत रेती उपासा करण्यास विरोध केला. परंतु रेती उपसा करणाऱ्या अज्ञातांनी लोकांचा विरोध पाहूनही रेती उपसा करणे थांबवले नाही. रात्री १ वाजेपर्यंत नदीत पंपचा वापर करून रेती उपसा सुरू होता.
शनिवारी सकाळी म्हार्दोळचे पोलीस निरीक्षक योगेश सावंत व इतर कर्मचाऱ्यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना रात्री घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. पंपाद्वारे उपसा होडीत करून रेतीची पाळी भागातून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना सावईवेरे भागात काहीच आढळून आले नाही. यासंबंधी नदीपरिवहन खात्याला माहिती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
व्यवसायातील ‘एजंटां’कडून स्थानिकांना धमक्या
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीरपणे रेती उपसा करणाऱ्या अज्ञातांकडून सेटिंग करण्यात काही एजंट तयार झाले आहेत. एजंटना प्रत्येक होडीच्या मालकाकडून दर आठवड्याला काही रक्कम दिली जाते. सदर रक्कम मिळत नसल्याने काही एजंट सध्या गब्बर झाले आहेत. त्यांच्याकडून स्थानिक लोकांनासुद्धा धमक्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे रेती व्यवसायामुळे परिसरात मोठे गुन्हे घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेती उपशामुळे पुराचे पाणी घरात येण्याची भीती
स्थानिक ग्रामस्थ अनंत पारकर यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री स्थानिकांनी एकत्र येऊन रेती उपसा करण्याला विरोध दर्शविला. रेती उपसा केल्यामुळे काठावरील माती वारंवार कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मातीचे कठडे कोसळत असल्याने पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी लोकांच्या घरात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रेती उपसा करणारे कामगार नदीच्या काठावर मध्यरात्री दारूच्या नशेत मौजमजा करत असतात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा