अडवई-सत्तरीच्या जंगलात शिकारीवेळी युवकाला लागली होती गोळी

पणजी : अडवई-सत्तरीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या दोघांपैकी हेमंत हिरबा देसाई याचा छातीत गोळी लागून मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने संशयित अभिजित देसाई याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या आरोपांखाली आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी जारी केला.
या प्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे ९ वाजता हेमंत देसाई आणि अभिजित देसाई अडवई-सत्तरीच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. त्यांनी झाडावर तयार केलेल्या विशेष ठिकाणावरून शिकार करण्याची योजना आखली होती. तयारीदरम्यान अभिजितच्या हातून चुकून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि समोर उभ्या असलेल्या हेमंत यांच्या छातीत गोळी लागली.
गंभीर जखमी अवस्थेत हेमंत यांना वाळपई येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर हेमंत यांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून अभिजित देसाई याला अटक केली.
दरम्यान, २३ जुलै २०२५ रोजी पणजी येथील सत्र न्यायालयाने अभिजित देसाई याला सशर्त जामीन मंजूर केला. तपास पूर्ण करून वाळपई पोलिसांनी २८ जुलै २०२५ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रथमदर्शनी उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानींची दखल घेतली. मात्र कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार झाल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याने वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलमांमधून संशयिताची मुक्तता करण्यात आली. त्याचवेळी सदोष मनुष्यवध, पुरावे नष्ट करणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या आरोपांखाली दोषारोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.