ग्रामस्थांचा पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा

पणजी : गोळाली (Golali) येथील बंधाऱ्यावर येण्यास पर्यटकांना (Tourist) तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी बिअरच्या रिकाम्या तसेच फुटलेल्या बाटल्या, प्लास्टीक (Plastic) टाकल्याने धोका निर्माण झाला आहे. यापुढे बंदी असेपर्यंत याठिकाणी येणारे पर्यटक, बाटल्या, कचरा टाकणाऱ्यांची पोलिसांत (Police) तक्रार करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.
पुढील सूचना येईपर्यंत बंधाऱ्यावर येण्यास पर्यटकांना बंदी राहणार आहे. बिअरच्या बाटल्या, प्लास्टीक कचरा टाकल्याने संपूर्ण परिसर अस्वच्छ व धोकादायक बनला आहे. बंधाऱ्याच्या पाण्यात व आसपासच्या परिसरात फुटलेल्या काचांमुळे पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टीक कचरा पाण्यात टाकल्याने जलस्त्रोतही प्रदूषित बनला आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील सूचना येईपर्यंत बंधाऱ्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणारे, बाटल्या, कचरा टाकणाऱ्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे. ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन बंधाऱ्यात टाकलेल्या बाटल्या, कचरा काढून परिसर स्वच्छ केला. पाण्याचे स्तोत्र स्वच्छ ठेवावेत व पर्यावरणाचा आदर राखावा, ‘निसर्ग स्वच्छ ठेवा, स्थानिकांचा सन्मान करा’ असा संदेश ग्रामस्थांनी दिला आहे.