आक्षेप नोंदवण्यासाठी एक महिन्याचा अवधी : उद्योग खाते

पणजीः डिचोलीतील (Bicholim) सुर्ला गावात कोका-कोलाचे (Coca Cola) गोदाम आणि माजोर्डा (Majorda) येथे एक तारांकीत हॉटेल (Hotel) उभारण्याचा प्रस्ताव गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) (IPB) ठेवला आहे. या दोन्ही प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी उद्योग खात्याने सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. या संदर्भातील सूचना उद्योग खात्याने जारी केली आहे.
मेसर्स अॅक्रक्स मार्केटींग एलएलपी यांनी २९ ऑगस्ट, २०२५ या दिवशी डिचोलीच्या सुर्ला गावात कोकाकोला या अल्कोहोल मुक्त शितपेयाचे गोदाम आणि वितरण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला अर्ज सादर केला होता. मंडळाने प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. आणि सदर क्षेत्राला गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे.
हा प्रकल्प सुर्लाच्या आंबेकोडील मळ परिसरात २६०० चौ. मीटर जागेत सर्व्हे क्रमांक २/१, २/२, २/३, २/४, २/७ मध्ये येतो.
दरम्यान, मेसर्स जेएमजे बीच रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून २७ फेब्रुवारी २०२४ मध्ये सासष्टी तालुक्यातील माजोर्डा गावात अस्तित्वात असलेल्या हॉटेलच्या मालमत्तेत ६० खोल्यांचा विस्तार करण्याच्या प्रकल्पासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अर्ज केला आहे. मंडळाने सदर प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. आणि सदर क्षेत्राला गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. माजोर्डाच्या ‘अफोरमेंटो दास प्रेस’ परिसरात ७८०० चौ. मीटर जागेत सर्व्हे क्रमांक ६७/२ मध्ये येते.
या दोन्ही प्रकल्पांसाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सिंगल विण्डो मंजुरी सुलभता अधिनियम, २०२१ (२०२१ चा गोवा अधिनियम १९) च्या कलम ४२ च्या उपकलम (२) खाली ज्या कुणाला सदर प्रस्तावाच्या बाबतीत काही आक्षेप घ्यायचा असल्यास, त्यांनी आपले आक्षेप कारणांसहीत लेखी स्वरुपात उद्योग खात्याला पाठवणे गरजेचे आहे. आपले आक्षेप एका महिन्याच्या कालावधीत संचालक, उद्योग, व्यवसाय आणि वाणिज्य संचालनालय, गोवा सरकार, पणजी यांना सादर करावेत, अशी सूचना उद्योग खात्याने जारी केली आहे.