कर्मचारी भरती : आतापर्यंत फोंडा मतदारसंघातून सर्वाधिक ६३ उमेदवारांना नोकऱ्या

बाणावलीतून सर्वांत कमी ३ उमेदवारांची झाली निवड; राज्यातून १११७ जणांची निवड

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
03rd March, 05:14 pm
कर्मचारी भरती : आतापर्यंत फोंडा मतदारसंघातून सर्वाधिक ६३ उमेदवारांना नोकऱ्या

पणजी : एलडीसी (LDC), शिपाई, शिक्षक (Teacher), एकाऊंटंट, पंचायत सचिव, लॅबोरेटरी असिस्टंट या सारख्या क श्रेणीतील कर्मचाऱ्यांची निवड कर्मचारी भरती आयोगामार्फत (GSSC) होत आहे. आतापर्यंत कर्मचारी भरती आयोगामार्फत विविध पदांसाठी मिळून फोंड्यातील सर्वाधिक म्हणजे ६३ उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. बाणावली (Benaulim) मतदारसंघातून सर्वांत कमी म्हणजे ३ उमेदवारांची निवड झाली आहे.

कर्मचारी भरती आयोगाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. उत्तर गोव्यातून (North Goa) ६०७ तर दक्षिण गोव्यातून (South Goa) ५१० मिळून आतापर्यंत १११७ उमेदवारांची निवड आयोगातर्फे झाली आहे. आयोगामार्फत प्रत्येक पदासाठी आवश्यक ज्ञानाची परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यांचीच भरती केली जात आहे.

मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातून ५४ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघासाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. पोटनिवडणूक होणार असलेल्या फोंडा मतदारसंघातून कर्मचारी भरती आयोगामार्फत सर्वाधिक ६३ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.

फोंडा मतदारसंघापाठोपाठ प्रियोळ ६०, साखळी ५४, मडकई ५१, पर्वरी ५०, काणकोण ४८ या मतदारसंघांचा क्रमांक लागतो. योगायोगाने हे सर्व मतदारसंघ सत्ताधारी पक्षाकडे आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या वाळपई मतदारसंघात आयोगामार्फत ३० तर देविया राणे यांच्या पर्येत मतदारसंघातून ३४ उमेदवारांची निवड झाली आहे. केपे मतदारसंघात काँग्रेसचे एल्टन डिकोस्ता आमदार आहेत. केप्यातून ४५ उमेदवारांची निवड झालेली आहे.