नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी खास विधेयक

विजय सरदेसाईंकडून नदी संवर्धन विधेयकाची नोटीस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
03rd March, 05:28 pm
नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी खास विधेयक

पणजी : नद्यांचे (River) संवर्धन व प्रदूषण रोखण्यासाठी गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) आमदार विजय सरदेसाई हे अधिवेशनात गोवा (Goa) नद्यांचे संवर्धन व संरक्षण विधेयक २०२६ विधानसभेत सादर करणार आहेत. हे विधेयक दाखल करण्याची नोटीस त्यांनी विधीमंडळाला दिली आहे. नद्यांच्या सुरक्षेसाठी खास प्राधिकरण स्थापन करण्याबरोबर प्रदूषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद ह्या विधेयकात आहे.

नद्यांचे आज मोठ्या प्रमाणावर प्रदूषण (Pollution) होत आहे. प्रदूषणाला आळा घालण्याबरोबर त्यांच्या सीमांचेही रक्षण होणे गरजेचे आहे. या हेतूने हे विधेयक मांडण्याची नोटीस सादर केल्याची माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. नद्यांचे संरक्षण करण्यासाठी खास प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे.

दरम्यान, आरजीचे आमदार विरेश बोरकर हे सुद्धा गोवा नदी संरक्षण व व्यवस्थापन विधेयक २०२६ विधानसभेत मांडणार आहेत. पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करण्याबरोबर त्यांचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन व्हायला हवे. गोव्याच्या संरक्षणासाठी आरजी पक्ष लढा देत आहे.  नद्या तसेच पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन हा याचाच भाग असल्याची माहिती आमदार विरेश बोरकर यांनी दिली.

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व आरजीचे विरेश बोरकर या दोघांचीही विधेयके स्वतंत्र आहेत.