राज्यातील डेंग्यू नियंत्रणात ; फेब्रुवारीमध्ये केवळ १ रुग्ण

जानेवारीत सापडले होते ६ रुग्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th March, 11:57 pm
राज्यातील डेंग्यू नियंत्रणात ; फेब्रुवारीमध्ये केवळ १ रुग्ण

पणजी : आरोग्य खात्याने विविध उपाययोजनांमुळे राज्यातील डेंग्यू नियंत्रणात आला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात डेंग्यूचा केवळ १ रुग्ण आढळला. मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये डेंग्यूचे ९ रुग्ण आढळले होते. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये २० रुग्ण आढळले होते.
डेंग्यूच्या हॉटस्पॉट ठिकाणी जाऊन तेथील डासांच्या उत्पत्तीची स्थळे नष्ट करणे, याविषयी जागृती करणे यामुळे डेंग्यूचे रुग्ण कमी आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये एक रुग्ण केपे तालुक्यातील होता. हा रुग्ण स्थलांतरित कामगार आहे. राज्यात चालू वर्षातील पहिल्या दोन. महिन्यांतील बहुतेक रुग्ण हे स्थलांतरीत कामगार वस्तीमधील किंवा बांधकाम प्रकल्पात राहणारे कामगार आहेत. येथे उघड्यावर पाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये डासांची पैदास होऊन डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यातील डेंग्यू हॉटस्पॉट ठिकाणांहून स्थलांतरित कामगार राज्यात येत असल्याने येथे रुग्ण आढळत आहेत.
घरातील कुंड्या, फ्रीज खाली किंवा अन्य ठिकाणी साठलेले पाणी आठवड्यातून दोन वेळेस साफ करणे आवश्यक आहे. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणे देखील गरजेचे आहे. पाणी टंचाई असेल तर पाणी साठवून त्यावर झाकण लावणे आवश्यक आहे. असे पाणी सात दिवसांत वापरले गेले पाहिजे.
खात्यातील अधिकारी घरोघरी जाऊन पाणी साठवण्याची योग्य पद्धतीची माहिती देत आहेत. स्थानिक पंचायतींना सोबत घेऊन डासांच्या पैदासीची ठिकाणे नष्ट करण्याचे काम सुरू असल्याचे डॉ.महात्मे यांनी सांगितले.
रुग्ण संख्या
महिना                २०२३          २०२४          २०२५         २०२६

जानेवारी             ४               ३५              ७               ६
फेब्रुवारी            ७                २०              ९                १